दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात
By admin | Published: August 27, 2016 01:51 AM2016-08-27T01:51:20+5:302016-08-27T01:51:20+5:30
भरधाव वेगाने निघालेल्या दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात झाला.
मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी टेम्पोचालक सुदाम जाधव (२२) याला अटक केली आहे.
मोहम्मद जयदुर अब्दुल रहेमान (३०), फैसल निसार अली अहमद (१९), राहुल सुरमान अली (३२), रुबल अहमद अब्दुल रहेमान आणि दीपक कहार (४३) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास रहेमान कुटुंबीयांनी डोंगरी येथून नालासोपाराकडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली. दरम्यान, दादर येथील चित्रा सिनेमागृहासमोरील मार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुधाच्या टेम्पोने त्यांना धडक दिली. त्याचदरम्यान त्यांच्यापुढील टॅक्सीला टेम्पोची धडक झाली. या अपघातात दोन्ही टॅक्सी उलटून अपघात झाला. या अपघातात चालकांसह ४ प्रवासी जखमी झाले आहेत.
प्रवासी कहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या धडकेत दोन्हीही टॅक्सी एकमेकांना आदळल्या. मीही त्यात जखमी झालो. मात्र पाठच्या टॅक्सीत चौघे अडकल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. चौघांनाही सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यामध्ये माझ्यासह माझा टॅक्सीचालकही किरकोळ जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)