दोन हजार कोटींचा तूर घोटाळा! - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:05 AM2018-03-28T05:05:36+5:302018-03-28T05:05:36+5:30
राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेत मर्जीतील कंपनीला टेंडर देण्यात आली. त्यामुळे दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केला.
मुंबई : राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेत मर्जीतील कंपनीला टेंडर देण्यात आली. त्यामुळे दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केला. सरकारमधील मंत्री आणि विभागातील अधिकारीच या भ्रष्टाचारामागे असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुंडे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म्हाडा व एमएसआरडीसीमधील भूखंड घोटाळा आणि मंत्रालयातील सध्या गाजत असलेला उंदीर घोटाळ्याचा समाचार घेताना या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.
मागील वर्षी खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याचे काम स्वत:च्या मर्जीतील सप्तशृंगी कंपनीला देण्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. डाळ बनविण्याची कोणतीही यंत्रणा नसताना सप्तश्रृंगी कंपनीलाच निविदा द्यायची असल्याने अटीत वारंवार बदल करण्यात आले. भरडाईसाठी दररोज दोन हजार मेट्रिक टन क्षमता आवश्यक असताना केवळ ५० मेट्रिक टन प्रतिदिन भरडाईची अट टाकल्यामुळेच आज गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन डाळ पडून असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या प्रक्रियेत फेडरेशनने घेतलेल्या १४०० कोटी रुपयांवर व्याज द्यावे लागत असल्याचे मुंडे म्हणाले.