३५ हजारांच्या लाचेसाठी घेतल्या दोन हजाराच्या नव्या नोटा
By admin | Published: November 13, 2016 01:33 AM2016-11-13T01:33:18+5:302016-11-13T01:30:31+5:30
कोल्हापुरातील प्रकार : जिल्हा परिषदेतील‘माध्यमिक’च्या वरिष्ठ सहायकास अटक; नव्या नोटाच मागण्याची राज्यातील पहिलीच घटना
कोल्हापूर : मुख्याध्यापक पदोन्नती प्रस्तावास जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहायकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित आरोपी चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर (वय ४५, रा. संभाजीनगर, मूळ गाव शिवाजी रोड, मुरगूड, ता. कागल) असे त्याचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौकातील एका हॉटेलच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा व्यवहारात येऊन दोनच दिवस झाले तोपर्यंत सावर्डेकर हे त्याच १७ नोटा घेताना जाळ््यात अडकले. त्यामुळे नव्या चलनानंतरची ही राज्यातील पहिली घटना आहे.
याबाबतची हकीकत अशी, मनोहर वसंतराव जाधव हे शिवस्मारक शिक्षण मंडळाच्या महाराणा प्रताप हायस्कूल, दुधाळी येथे लिपिक असून, ते जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे शहर सचिव आहेत. हायस्कूलच्या पूर्वीच्या महिला मुख्याध्यापिका सय्यद या सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पदोन्नतीने नाथाजी राजमाने यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाची मान्यता घेण्यासाठी दि. २ नोव्हेंबरला संस्थेतर्फे प्रस्ताव पाठविला होता. त्याची चौकशी करण्यासाठी सोमवारी (दि. ७) लिपिक जाधव हे जिल्हा परिषदेत गेले. येथील वरिष्ठ सहायक सावर्डेकर याला भेटले असता प्रस्तावावर टिप्पणी तयार करून शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या सहीने मंजुरी घेण्यासाठी ४० हजार रुपयांची त्यांने मागणी केली. त्यानंतर जाधव यांनी सावर्डेकर यांच्या विरोधात मंगळवारी (दि. ८) लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांच्याकडे तक्रार दिली. बुधवारी (दि. ९) जिल्हा परिषदेमध्ये दोन सरकारी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. १000 व ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्याने नवीन नोटा चलनात आल्यानंतर सापळा लावण्याचा निर्णय आफळे यांनी घेतला.
शनिवारी (दि. १२) जाधव हे दसरा चौकातील राष्ट्रीयकृ त बँकेतून पैसे काढून लाचलुचपत कार्यालयात आले. त्यांनी सावर्डेकरला नवीन नोटांची तयारी झाल्याचे फोन करून सांगितले. त्यावर त्याने पैसे घेऊन अगोदर जिल्हा परिषदेत नंतर मध्यवर्ती बसस्थानक व शेवटी दसरा चौकात येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी सापळा लावला. सायंकाळी सहाच्या सुमारास सावर्डेकर येथील एका हॉटेलमध्ये आला. याठिकाणी जाधव यांच्याकडून ३५ हजार रुपये स्वीकारले. चहा पिऊन हॉटेलमधून बाहेर येताच पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून दोन हजार रुपयाच्या १७ व १०० रुपयाच्या १० नवीन चलनी नोटा हस्तगत केल्या. अचानक झालेल्या या कारवाईमुळे सावर्डेकर भांबावून गेला. कारवाईची चाहूल जिल्हा परिषदेला लागताच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यातून एक च खळबळ उडाली.
वर्षात तिसऱ्यांदा छापा...
वरिष्ठ वेतनश्रेणीचा आदेश काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना दि. १ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा विभागाचे वरिष्ठ सहायक विकास दत्तात्रय लाड (वय ५३, रा. उचगाव, ता. करवीर), त्याचा सहकारी माध्यमिक शिक्षण विभागाचा कनिष्ठ लिपिक विनायक पाटील (रा. मंगळवार पेठ) यांना अटक केली होती. वैद्यकीय बिल काढण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य सहायक नंदकुमार शंकर कोळी (४६, रा. धरणगुत्ती रोड, जयसिंगपूर) व त्यांना मदत करणारा हातकणंगले पंचायत समितीचा शिपाई मोहन राजाराम सोनवणे (४०, रा. पंचायत समिती क्वॉर्टर्स, हातकणंगले) यांना अटक केली होती.
—-
कोठडीची हवा
चंद्रकांत सावर्डेकर यांच्याकडे लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू होती. तो राहत असलेल्या संभाजीनगर, मुरगूड येथील घरावर पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे व मालमत्तेची माहिती घेतली. त्यानंतर रात्री उशिरा त्याची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. याठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
फाईलच हलत नाही..
माध्यमिक शिक्षण विभागाबध्दल लोकांच्या सातत्याने तक्रारी आहेत. तिथे कोणतेही काम असो, पैसे दिल्याशिवाय फाईलच हलत नाही असा अनुभव लोकांना येतो. तरीही शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही हे कसे लक्षात येत नाही अशी विचारणा लोकांतून झाली.