मुंबई महानगर पालिकेच्या रिंगणात २ हजार ‘पहिलवान’

By admin | Published: February 4, 2017 04:46 AM2017-02-04T04:46:33+5:302017-02-04T04:46:33+5:30

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म

Two thousand 'wrestling' in the Mumbai Municipal Corporation's Rally | मुंबई महानगर पालिकेच्या रिंगणात २ हजार ‘पहिलवान’

मुंबई महानगर पालिकेच्या रिंगणात २ हजार ‘पहिलवान’

Next

- गौरीशंकर घाळे, मुंबई

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म टेकविण्याच्या या खेळीमुळे सर्वपक्षीय इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. मुंबईतील सर्व २३ वॉर्डांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर इच्छुकांनी सर्व तयारीनिशी तळ ठोकला होता. मुंबईतील २२७ जागांसाठी शेवटची माहिती हाती येईपर्यंत २ हजार ७१८ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले.
युती आणि आघाडीतील पक्षांनी यंदा स्वबळाचा नारा दिल्याने सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान होते. त्यावर मात करण्यासाठी थेट एबी फॉर्म वितरित करण्याचे धोरण राजकीप पक्षांनी स्वीकारले. शेवटचा दिवस उजाडला तरी पक्षाकडून निरोप येत नसल्याने इच्छुकांनी मात्र अपक्ष म्हणून अर्ज भरण्यास सुरुवात केली. एबी फॉर्म मिळाला तर पक्षाचे अधिकृत उमेदवार अन्यथा अपक्ष लढायचे या इराद्याने अनेकांनी अर्ज दाखल केले. गुरुवारपर्यंत केवळ १६० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
शुक्रवारी शेवटच्या दिवशी मात्र हा आकडा दोन हजारांच्या पुढे गेला. शेवटची माहिती हाती आली तेव्हा मुंबईतील २३ वॉर्डांमधून २ हजार ७१८ अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले होते. मंगळवारी, ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर असणार आहे.
बंडखोरांना चुचकारण्याचे आव्हान
पक्षाचे तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजांनी बंडाचा झेंडा उभारला. त्यामुळे आता नाराजांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. मंगळवार, ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोय असल्याने तोपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

काँग्रेसचे घोळात घोळ
मन बदला, मुंबई बदलेल अशी हाक देत काँग्रेसने मुंबईतील शिवसेना-भाजपाची सत्ता उलथवण्याची हाक दिली. मात्र गटबाजीने पोखरलेल्या नेत्यांची मने मात्र जुळली नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई काँग्रेसमधील राडा सुरूच राहिला. ११५ उमेदवारांची जाहीर केलेली पहिली यादी स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली. गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत डेरेदाखल झालेले पक्षाचे केंद्रीय नेते भूपिंदर हुड्डा यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील सर्व सहा जिल्हाध्यक्षांसोबत मॅरेथॉन बैठका केल्या. या चर्चेनंतर संबंधित उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचविण्यासाठी धावाधाव करावी लागली.

‘मातोश्री’वर खलबते
मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका बसल्याने शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचे शेजारच्या प्रभागांमध्ये पुनर्वसन करावे लागले.
मात्र, या पुनर्वसन मोहिमेला स्थानिक शिवसैनिकांनी आणि इच्छुकांनी कडाडून विरोध केला. मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर, युवासेनेचे अमेय घोले, किशोरी पेडणेकर आदींच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला. अखेर ‘मातोश्री’ने गुरुवारी रात्री बंडखोरांसाठी चर्चेचे दरवाजे उघडले.
‘मातोश्री’वरून सबुरीचा सल्ला आल्यानंतर मात्र शिवसैनिकांनी विरोधाची तलवार म्यान केली. काही ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल झाले असले तरी ७ तारखेपूर्वी अर्ज मागे घेतले जातील, असे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Two thousand 'wrestling' in the Mumbai Municipal Corporation's Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.