दोन टन विषारी आंबे श्रीरामपूरमध्ये नष्ट
By admin | Published: May 24, 2015 01:56 AM2015-05-24T01:56:30+5:302015-05-24T01:56:30+5:30
रासायनिक दूधनिर्मिती व भेसळीचे केंद्र बनलेल्या श्रीरामपूर येथे आंब्यांमध्येही विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : रासायनिक दूधनिर्मिती व भेसळीचे केंद्र बनलेल्या श्रीरामपूर येथे आंब्यांमध्येही विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सुमारे दोन टन आंबे कचऱ्यात टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरविला.
कृत्रिम रासायनिक दूध निर्मिती व भेसळीमुळे श्रीरामपूर प्रकाशझोतात आले होते. या गुन्ह्यातील सव्वाशे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले. त्यापाठोपाठ आता कृत्रिमरित्या आंबे पिकवून काही व्यापारी झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग अनुसरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्याऐवजी त्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड व इतर रसायनांचा वापर केल्याची नुसती चर्चा होती. श्रीरामपूरमध्ये अशा प्रकारे आंबा पिकवून विषारी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ठोक फळ विक्रेत्यांच्या गोदामांमध्ये छापे मारले. त्यात व्यापाऱ्यांकडील १,७२६ किलो आंबे जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)