पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू
By admin | Published: May 9, 2017 04:50 PM2017-05-09T16:50:26+5:302017-05-09T16:50:26+5:30
पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 9 - पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथे ही दुर्घटना घडली. साजिद सलाम अली शेख (वय 20) व अब्दुल रहमान बादशहा (वय 18 दोघेही राहणार मुंब्रा, ठाणे) अशी या बुडून मृत झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार साजिद व अब्दुल यांच्यासह आठ जणांचा एक ग्रुप सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरात फिरायला आला होता. आंबेगाव येथील बोटिंग क्लबच्या मागील बाजूला हे सर्व जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले, यावेळी ग्रुपमधील काही जण बुडू लागल्याने साजिद, अब्दुल आणि अन्य मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये बुडालेल्या मित्रांना वाचविण्यात यश आले. मात्र वाचविण्यासाठी गेलेले साजिद व अब्दुल हे बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्र हा लोणावळ्यातील रेस्क्यू टीमचे सदस्य महेश मसने, अजय राऊत, महिपती मानकर, अशोक कुटे, ब्रिजेश ठाकुर, अतुल लाड, प्रवीण देशमुख, अजय शेलार, दिनेश पवार, विकास मावकर, समीर जोशी, रोहित वर्तक, सागर कुंभार, सुनील गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवत दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
पंधरा दिवसापुर्वी याच धरणात दोन पर्यटकांना जलसमाधी मिळाली होती. पोहता येत नसताना देखिल हलगर्जीपणाने पर्यटक धरणात उतरत असल्याने धरण क्षेत्रात पर्यटक बुडण्याच्या घटना वाढल्या आहेत.