लातूरच्या पाण्यासाठी दोन रेल्वेगाड्या

By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:40+5:302016-04-03T03:50:40+5:30

तीव्र दुष्काळ आणि फुफाट्याचा उन्हाळा यामुळे हंडाभर पाण्यासाठीही मोताद झालेल्या लातूर जिल्ह्याला पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या

Two trains on Latur water | लातूरच्या पाण्यासाठी दोन रेल्वेगाड्या

लातूरच्या पाण्यासाठी दोन रेल्वेगाड्या

Next

मुंबई: तीव्र दुष्काळ आणि फुफाट्याचा उन्हाळा यामुळे हंडाभर पाण्यासाठीही मोताद झालेल्या लातूर जिल्ह्याला पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन गाड्यांनी एका फेरीत ५५ लाख लिटर पाणी आणता येईल.
महाराष्ट्र सरकार आणि मध्य रेल्वेने केलेल्या विनंतीनुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोन गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या दोन्ही गाड्या १५ एप्रिलपर्यंत पाण्याच्या वाहतुकीसाठी सज्ज होतील व उन्हाळा संपेपर्यंत त्या उपलब्ध असतील.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या दोन रेल्वेगाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात पंढरपूर-लातूर या २७५ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी चालविल्या जातील. स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार गाड्यांच्या फेऱ्या ठरविल्या जातील. रेल्वेकडे पाण्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र टँकर वाघिणी नाहीत. त्यामुळे अन्य द्रव पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरवाघिणी स्वच्छ धुवून घ्याव्या लागतील. ‘स्टीम क्लीनिंग’ तंत्राने टँकरवाघिणी स्वच्छ धुण्याचे काम रेल्वेच्या कोटा येथील कार्यशाळेत करण्यात येत आहे. कोटा कार्यशाळेतून स्वच्छ धुतलेल्या ५० टँकरवाघिणींची पहिली रेल्वेगाडी ८ एप्रिलला व दुसरी रेल्वेगाडी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल.
या रेल्वेगाडीच्या प्रत्येक टँकरवाघिणीची क्षमता ५५ हजार लिटर असेल. म्हणजेच दोन्ही गाड्यांनी एक फेरी मारली की ११ टँकरवाघिणींमध्ये मिळून एकावेळी सुमारे ५५ लाख लिटर पाण्याची वाहतूक करणे शक्य होईल.
भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष निर्देश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयास दिले असून त्यानुसारच लातूरसाठी ही सोय करण्यात येत आहे. याआधी राजस्थान सरकारने केलेल्या विनंतीनुसार उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागात नसिराबाद ते भिलवाडा या १०९ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी अशाच प्रकारे जानेवारीपासून अनेक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून ती सोयही उन्हाळा संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
उजनीचे पाणी आणणार
रेल्वेने पाण्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध केल्या असल्या तरी त्यांचा वापर कधी व किती प्रमाणात करायचा याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. महत्वाचे म्हणजे थेट जलाशयापर्यंत रेल्वेमार्ग नसल्याने तेथून रेल्वेगाडीपर्यंत पाणी आणणे, ते टँकरवाघिणींमध्ये भरणे व लातूरला पोहाचल्यावर ते उतरवून घेऊन त्याची साठवणूक करणे हे खरे कळीचे मुद्दे आहेत.
लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या संदर्भात राज्य सरकारला जो प्रस्ताव पाठविला त्यानुसार उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले तर ते जूनच्या अखेरपर्यंत पुरु शकेल व पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल, असे म्हटले होते. लातूरसाठी बाहेरून पाणी आणण्याची वेळ आलीच तर पंंढरपूर-कुर्र्डुवाडी-बार्शी-लातूर या मार्गाने रेल्वेच्या टँकर वाघिणींमधून एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर पाणी आणण्याचा प्रस्ताव असून पाण्याच्या वाहतुकीस किमान १८ तासांचा कालावधी लागेल, असे जिल्हाधिकारी पोले यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Two trains on Latur water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.