पेब किल्ल्यावर दोन ट्रेकर्स दरीत कोसळले

By admin | Published: July 10, 2017 05:43 AM2017-07-10T05:43:01+5:302017-07-10T05:43:01+5:30

पेब किल्ला येथे दोन ट्रेकर्स रविवारी दुपारी सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळले होते

Two trekers collapsed in the valley on Peb fort | पेब किल्ल्यावर दोन ट्रेकर्स दरीत कोसळले

पेब किल्ल्यावर दोन ट्रेकर्स दरीत कोसळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : येथील पेब किल्ला येथे दोन ट्रेकर्स रविवारी दुपारी सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळले होते. त्यांना येथील आदिवासी, वनविभाग, खोपोली येथील ट्रेकर्स आणि नेरळ, माथेरान पोलिसांच्या मदतीने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सुखरूप बाहेर काढण्यात आले.
रविवार, ९ जुलै रोजी मुंबई येथील ट्रेकर्स हर्षल व्होरा याने ट्रेकिंग कॅम्प पेब किल्ल्यावर आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये मुंबईतील ३० ट्रेकर्स सहभागी झाले होते. ते सर्व रविवारी सकाळी नेरळ येथे लोकलने आल्यानंतर नेरळ फणसवाडी मार्गे पेब किल्ल्यावर चढले. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर त्यांचा ग्रुप दुपारी दीड वाजता माथेरानकडील रस्त्याने पेब किल्ला उतरू लागला. अर्धी पायवाट उतरल्यानंतर त्यातील रिया शाह (२१, रा. मालाड) या तरुणीचा पाय घसरला. त्या वेळी ट्रेकिंग कॅम्प आयोजित करणारा हर्षल व्होरा याने रिया शहाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रियासोबत हर्षलदेखील दरीत कोसळला. रहिवाशांनी याची माहिती दिल्यानंतर खोपोली येथील यशवंती ट्रेकर्स आणि कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव यांनीदेखील पेब किल्ल्याचा रस्ता गाठला. त्याआधी नेरळ येथील रहिवाशांनी वन विभागाचे कर्मचारी सतीश डोईफोडे, जीवनसिंग सुलाने यांच्या मदतीने २५० फूट खोल दरीत उतरून हर्षल व्होरा यास बाहेर काढले. त्यानंतर नेरळ पोलीसही घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत हर्षल व्होरा याचा उजवा पाय मोडला असून, उजवा हातदेखील फ्रॅक्चर झाला आहे.
तीन किलोमीटर पायपीट
खोपोली येथील यशवंती ट्रेकर्सचे गुरु नाथ साठलेकर, धर्मेंद्र रावळ, शेखर जांभळे, दर्श अभाणी, महेश जांभळे, तसेच गणेश पवार, अजय गायकवाड यांनी दरीत उतरून या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर तीन किलोमीटरचे अंतर चालून डोलीच्या साहाय्याने मिनीट्रेनच्या ट्रॅकवर आणण्यात आले.

Web Title: Two trekers collapsed in the valley on Peb fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.