पवना धरणात मुंब्य्रातील दोन बुडाले
By admin | Published: May 10, 2017 02:32 AM2017-05-10T02:32:09+5:302017-05-10T02:32:09+5:30
पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा (पुणे) : पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
माजिद रुस्तम अली शेख (वय २०) व अब्दुल रहमान मोहंमद रफिक बटेशाह (वय १९, दोघेही रा. मुंब्रा, ठाणे) अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. या दोघांसह आठ जणांचा एक गट पवना धरण परिसरात फिरायला आला होता. आंबेगाव येथील बोटिंग क्लबच्या मागील बाजूला हे सर्वजण पाण्यात उतरले. या वेळी ग्रुपमधील काही जण बुडू लागल्याने साजिद, अब्दुल व अन्य मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये बुडालेल्या मित्रांना वाचविण्यात यश आले. मात्र वाचविण्यासाठी गेलेले साजिद व अब्दुल बुडाले. दुर्घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्र या लोणावळ्यातील रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी आले. दुपारी तीनच्या दरम्यान त्यांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंधरा दिवसांपूर्वी याच धरणात दोन पर्यटकांना जलसमाधी मिळाली होती.