दुचाकी चोरणारी टोळी गजाआड
By Admin | Published: June 10, 2016 02:55 AM2016-06-10T02:55:54+5:302016-06-10T02:55:54+5:30
मुंबई, ठाणेसह नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : मुंबई, ठाणेसह नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून ७ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून ९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हे नियंत्रणात आणण्याच्या सूचना आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे राजन जगताप, प्रतापराव कदम, उत्तम दुंदळे, सुनील सावंत यांनी विशेष शोधमोहीम राबविली. तपास सुरू असताना जुईनगर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली.
पोलिसांनी महमद हसन गुलामअली मुच्छडा या मुंब्य्रातील तरूणाला अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने मुंब्रा परिसरातीलच दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरी केलेल्या ९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. यामध्ये नेरूळ, मुंबई आरसीएफ, शांतीनगर, शिर्डी पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी एक, मुंब्रा पोलीस स्टेशनमधील दोन असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोटारसायकल चोरल्यानंतर हे आरोपी मूळ रजिस्ट्रेशन क्रमांक बदलून त्या वाहनांची विक्री करत होते. गाडीचे पेपर्स दोन दिवसात देतो असे सांगून फसवत होते. (प्रतिनिधी)