दुचाकीने पोलिसाला नेले फरफटत
By admin | Published: September 21, 2016 03:09 AM2016-09-21T03:09:35+5:302016-09-21T03:09:35+5:30
नाकाबंदीदरम्यान दुचाकी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला अल्पवयीन दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याचा प्रकार सीवूड येथे घडला.
नवी मुंबई : नाकाबंदीदरम्यान दुचाकी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला अल्पवयीन दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याचा प्रकार सीवूड येथे घडला. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकासह दुचाकीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी सीवूड पुलालगत हा प्रकार घडला. एनआरआय पोलिसांमार्फत त्याठिकाणी नाकाबंदीत वाहनांची झाडाझडती सुरू होती. यावेळी बंदोबस्तावर कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कंकरे यांनी एका संशयास्पद दुचाकीस्वाराला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला. परंतु सदर दुचाकीस्वाराने कंकरे यांना चकमा देत नाकाबंदीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावल्यामुळे कंकरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
याकरिता त्यांनी मोटरसायकल पकडलेली असतानाही, अल्पवयीन चालकाने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अखेर बंदोबस्तावर असलेल्या इतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मोटरसायकलस्वाराला पाठलाग करून पकडले. त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्यास मोटरसायकलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा नुकताच कायदा झालेला आहे. त्यानुसार मोटरसायकल मालक जावेद खान याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले.
तर जखमी पोलीस अधिकारी कंकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
त्यांच्या हाताला व शरीराच्या काही भागावर जखमा झाल्या आहेत. (प्रतिनिधी)