एटीएम फोडणाऱ्या दोघांना पाठलाग करुन पकडले, ७७१ वेळा मारला लोखो रुपयांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:11 IST2020-10-20T02:52:07+5:302020-10-20T07:11:31+5:30
या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

एटीएम फोडणाऱ्या दोघांना पाठलाग करुन पकडले, ७७१ वेळा मारला लोखो रुपयांचा डल्ला
सातारा :महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळीचा साताºयातील शाहूपुरी पोलिसानी पदार्फाश केला. हरियाणामध्ये कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड आणि कार जप्त करण्यात आली आहे. सकरुद्दीन फैजरू (रा. घागोट, ता. जि. पलवल, हरियाणा) आणि रवी ऊर्फ रविंदर चंदरपाल (रा. मोहननगर, पलवल रेल्वेस्टेशनजवळ ता. पलवल हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. २० व दि. २१ सप्टेंबर रोजी सातारा येथील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तींनी एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने २ लाखांची रक्कम काढून बँकेची फसवणूक केली होती. याबाबत माहिती घेतांना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्याचे प्रकार होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या माहितीनुसार सातारा पोलिसांचे एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी कारमधून पळून जात असताना पाठलाग करून वरील दोघांना ताब्यात घेतले.
दोघांकडून ७७१ वेळा एटीएमचा वापर
संशयितांनी महाराष्ट्रात ४४० तसेच गुजरात ६४, कर्नाटक १०२ , राजस्थान २४, मध्यप्रदेश २९, उत्तर प्रदेश २, हरियाणा ४३ आणि इतर ठिकाणी ६७ असे एकूण ७७१ वेळा व्यवहार करून एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम काढून डल्ला मारल्याचे समोर आले आहे.