लाचखोर महिला सहायक उपनिबंधकासह दोघे गजाआड
By admin | Published: September 30, 2014 01:13 AM2014-09-30T01:13:17+5:302014-09-30T01:13:39+5:30
अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, ग्रामसेवकही अडकला जाळय़ात
अकोला : खरेदी खतासाठी १२00 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महिला सहायक उपनिबंधकासह रोजंदारीवर कार्यरत दोघा कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. लाचखोर महिला सहायक उपनिबंधकाचा रक्तदाब वाढल्याने तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तक्रारदारास त्याच्या प्लॉटवर घर बांधकाम करण्यासाठी बँकेने १६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यासाठी त्यांना बँकेकडे प्लॉट गहाण ठेवावा लागला. याकरीता दुय्यम उपनिबंधक कार्यालयाच्या खरेदीखताची आवश्यकता असल्याने, तक्रारदाराने कार्यालयाकडे अर्ज केला. खरेदीखत देण्यासाठी सहायक उपनिबंधक सुनंदा मोरे यांनी १ हजार रुपये आणि कार्यालयातील रोजंदारीवरील कर्मचारी आशिष पिंजरकर, हिंमत शिराळे यांनी २00 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तक्रारदार पैसे घेऊन दुय्यम उपनिबंधक कार्यालयात गेला. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी आधीच सापळा रचला होता. तक्रारदाराकडून सुनंदा मोरे यांनी १ हजार रुपये व आशिष पिंजरकर, हिंमत शिराळे यांनी प्रत्येकी १00 रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईची माहिती मिळ ताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गर्दी झाली होती. सुनंदा मोरेचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तिघा लाचखोरांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरापर्यंंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
*लाचखोर सहायक उपनिबंधकाच्या विरूद्ध अनेक तक्रारी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयामध्ये कार्यरत सहायक उपनिबंधक सुनंदा मोरे यांच्या लाचखोरीचे अनेक किस्से नेहमीच ऐकायला मिळ तात. कार्यालयात येणार्या नागरिकांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय मोरेबाई कामच करीत नसल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या; परंतु वरिष्ठ अधिकार्यांना त्यांचा वाटा मिळत असल्याने, त्यांचा मोरेबाईंवर कायम वरदहस्त आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या; परंतु त्यांच्या सापळय़ातून मोरेबाई निसटल्या होत्या.
** ५00 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकही गजाआड
गावनमुना आठ अ देण्यासाठी एका तक्रारदाराकडून ५00 रुपयांची लाच स्वीकारताना शिलोडा येथील ग्रामसेवकाला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. शिलोडा येथील ग्रामसेवक विनोद प्रल्हादराव आगळे याने तक्रारदारास प्लॉट नोंदणी झाल्याबाबत गाव नमुना आठ अ देण्यासाठी ५00 रु पयांची मागणी केली. पैसे देण्याचे ठिकाण ठरल्यानंतर तक्रारदार सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पंचायत समितीजवळ आला. याठिकाणी विनोद आगळे याने त्याच्याकडून ५00 रुपयांची लाच स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. या दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलिस निरीक्षक यू.ए. जाधव, पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी केल्या.