निरपराध बालकांची हत्या करणा-या दोन महिलांना होणार फाशी
By Admin | Published: August 14, 2014 05:25 PM2014-08-14T17:25:49+5:302014-08-14T17:31:32+5:30
बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणा-या दोन बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळली असून लवकरच त्यांना फाशी होणार आहे.
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ - बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणा-या दोन बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळली असून लवकरच त्यांना फाशी होणार आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी १३ बालकांचे अपहरण करून त्यांच्यापैकी ९ जणांची हत्या केली होती, यासाठी २००१ साली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या महिन्यात त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला असून त्यांना फाशी देण्यात येईल.
महाराष्ट्रात गाजलेल्या बालकांच्या हत्याकांडाचे हे प्रकरण असून आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी भीक मागण्यासाठी १३ मुलांचे अपहरण केले. त्यापैकी ज्या मुलांनी पैसे कमावणे बंद केले त्यांची दगडावर आपटून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अंजनाचा म़त्यू झाला. मात्र तिच्या दोन मुली रेणुका आणि सीमा यांना न्यायालयाने २००१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. सर्वोच्च न्यायालयानेही २००६ मध्ये त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यावर त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र राष्ट्रपतींनी तो अर्ज फेटाळत त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.