दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:00 AM2019-09-09T11:00:00+5:302019-09-09T12:06:29+5:30
पंढरपुरातील भीमा नदीजवळील प्रकार; उजनी आणि वीर धरणातून भीमेत विसर्ग सुरू
पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील बंधाºयावर दुचाकी धुत असताना एकाचा पाय घसरला अन् तो वाहून जाताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही भीमा नदीत वाहून गेला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुरसाळे बंधाºयावर घडली. लक्ष्मण सीताराम खंकाळ (वय १९), स्वप्नील सीताराम शिंदे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत.
उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे़ शनिवारी गुरसाळे बंधाºयावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास बंधाºयावर लक्ष्मण आणि स्वप्नील हे दोघे मित्र लक्ष्मणची दुचाकी धुत होते़ दरम्यान, प्रथम स्वप्नीलचा पाय घसरला अन् वाहत जाताना पाहून त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्ष्मणही पाण्यात वाहून गेला़ याबाबतची माहिती गुरसाळे पोलीस पाटलांनी तालुका पोलीस ठाण्यास दिली.
घटनास्थळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस निरीक्षक अनिल अवचर दाखल झाले़ तहसीलदारांनी त्वरित नगरपरिषदेच्या यांत्रिक बोट आणि होड्या मदतीसाठी मागविल्या़ शिवाय देगाव येथील काही स्वीमरही त्यांचा शोध घेत आहेत.
निराधार लक्ष्मण वाहून गेल्याने हळहळ
लक्ष्मण खंकाळ याचे वडील लहान असतानाच वारले तर गेल्यावर्षी आईचे निधन झाले. त्यामुळे तो आजीकडे राहत होता़ तो गावातीलच एका दूध संकलन केंद्राकडे दूध संकलन करून देण्याचे काम करीत होता़ शिवाय पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बीएच्या प्रथम वर्षात शिकत होता. शिक्षणासाठी पैशाची अडचण निर्माण व्हायची म्हणून आणि आजीला सांभाळण्यासाठी म्हणून तो दूध संकलनाचे काम करीत असे़ निराधार लक्ष्मण वाहून गेल्याचे कळताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्नीलही मंडप कॉन्ट्रॅक्टरकडे मजुरीची कामे करीत होता.