दोन ध्येयवेड्यांनी शोधल्या लुप्त २०० बारव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:45 AM2020-12-16T02:45:38+5:302020-12-16T02:45:49+5:30
पर्यटन विकसित करण्याचा मानस
- पोपट पवार
कोल्हापूर : कधी काळी गावगाड्याची तहान भागवणाऱ्या अन् नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या बारव (बांधीव ऐतिहासिक विहीर) आता लुप्त होत आहेत. मात्र, त्याच्या संवर्धनासाठी दोन ध्येयवेड्या तरुणांनी पायाला भिंगरी बांधली आहे.
मुंबईचा राेहन अशोक काळे आणि लोणावळ्याचा मनोज सिनकर हे ते ध्येयवेडे तरुण. दोघेही उच्चशिक्षित. राजस्थान आणि गुजरातमधील स्वच्छ, सुंदर बारव पाहिल्यानंतर झपाटलेल्या रोहनने महाराष्ट्रातल्या बारव संवर्धनाचा ध्यास घेतला. त्यासाठी त्याने नोकरीत एक वर्षाचा ब्रेक घेऊन बारव शोधण्यासाठी गावे पालथी घालायला सुरुवात केली. लोणावळ्यात स्वत:चा कापड व्यवसाय सांभाळणारा मनोजही रोहनच्या या मोहिमेत सामील झाला. आतापर्यंत या दोघांनी अनेक गावांत झाडा-झुडपांत लुप्त पावलेल्या जवळपास २०० बारव शोधल्या असून, त्याच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना ते आवाहन करत आहेत.
एक पर्यटनस्थळ अन् वारसाही
महाराष्ट्रातील अनेक बारवांचे बांधकाम हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बारव बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बारवचे बांधकाम हे वेगवेगळ्या शैलीत आहे. बारवभोवती झाडेझुडपे वाढल्याने त्या दुर्लक्षित आहेत. मात्र, ज्या बारव सुस्थितीत आहेत, अशा बारव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येऊ शकतात.