दहशतवादी प्रशिक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना अटक
By Admin | Published: October 23, 2014 11:49 AM2014-10-23T11:49:39+5:302014-10-23T11:49:55+5:30
हशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. २३ - दहशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही तरुण उमरखेड आणि हिंगोलीतील रहिवासी असून सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे ते दोघे दहशतवादी संघटनेच्या हस्तकांच्या संपर्कात आले होते.
उमरखेडमधील व्यावसायिक शहा मुदासीर उर्फ तल्हा (वय २५) आणि हिंगोलीत राहणारा शोएब अहमद खान उर्फ तारिकभाई (वय २४) हे दोघे सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील तरुणांशी संपर्कात आले होते. मुदासीर हा सिमीशी संलग्न असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन मायनोरिटी स्टुडंट या संघटनेचा सदस्य होता. तर शोएब हा इंडियन मुजाहिदीनशी संबंधीत संघटनेचा सदस्य होता. इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या अफगाणमधील तरुणाने या दोघांना अफगाणमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी यावे असे सांगितले होते. तर पाकिस्तानमधील तरुणाने या दोघांना स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या साधनांपासून बाँब कसा तयार करता येईल यासंदर्भातील माहिती पुरवली होती. अफगाण व पाकमधील तरुणाच्या माध्यमातून मुदासीर व शोएब हे दोघे हैद्राबादमधील मोथासिम बिल्लाहच्याही संपर्कात आले होते. विशेष म्हणजे ही ओळखही फेसबुकच्याच माध्यमातून झाली होती. मोथासिमने या दोघांना अफगाणला अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन इस्लामी देश बनवण्याचे प्रशिक्षण घ्या असे सांगत त्यासाठी आर्थिक मदत करायची तयारीही दर्शवली होती. हैद्राबादमध्ये मोथासिमला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलिस चौकशीत या नेटवर्कविषयीची नेमकी माहिती उघड होईल असे हैद्राबाद पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून जिहादविषयीचे लेख, पासपोर्ट, दहशतवादी प्रशिक्षणाची सीडी व रोख रक्कम जप्त केली आहे.