टी.वाय.बी.कॉमचा निकाल जाहीर, पण निकाल संकेतस्थळावर न आल्याने विद्यार्थी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 11:57 AM2017-08-28T11:57:47+5:302017-08-28T12:05:22+5:30
मुंबई विद्यापीठ गेल्या २ महिन्यापासून सातत्याने निकला न लागल्यामुळे चर्चेत आहे.
मुंबई, दि. 28- मुंबई विद्यापीठ गेल्या २ महिन्यापासून सातत्याने निकाल न लागल्यामुळे चर्चेत आहे. त्यानंतर अखेर विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉम च्या ५ व्या आणि 6 व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर केले. पण विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झाल्याने अजूनही निकाल संकेतस्थळावर दिसत नाहीत.
रविवारी रात्री उशीरा निकाल जाहीर झाल्याचं कळल्यावर विद्यार्थ्यांनी निकाल बघायला सुरुवात केली. पण निकाल दिसत नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. एकाच वेळी जास्त विद्यार्थी संख्या असल्याने निकाल पाहण्यास अडचणी येत असल्याचं विद्यार्थ्यांना वाटलं. पण विद्यापीठाकडूनच निकाल अपलोड होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे निकाल कधी पाहायला मिळेल याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठाचा गोंधळ अजूनही सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. पाचव्या सत्राचा निकाल हा ६०.९२ टक्के लागला असून सहाव्या सत्राचा निकाल ६५.५६ टक्के इतका लागला आहे. आतापर्यंत ४३२ अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत विद्यापीठाला अजून ४५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.
वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर तपासण्यासाठी आता विद्यापीठ अन्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य शाखेचे निकालच रखडले. सध्या विद्यापीठाला ४१ हजार १०५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर आयडॉलच्या ५८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. गणेशोत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी ८३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी ४ हजार ३४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. यात आयडॉलच्या वाणिज्यच्या २,६८४ तर, वाणिज्य नियमित अभ्यासक्रमाच्या १,६२१ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.