अशाप्रकारची तुलना यापूर्वीही झाली, हेमा मालिनी यांच्याबद्दल आदर : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:54 PM2021-12-20T12:54:24+5:302021-12-20T12:54:29+5:30
Hema Malini Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती.
राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती. गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. दरम्यान, यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.
"अशाप्रकारची तुलना यापूर्वीही करण्यात आली होती. हा हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे. याचा काही नकारात्मक अर्थ घेऊ नये. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनीदेखील अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं. आम्हाला हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
This type of comparison has happened earlier too. It's a respect for Hema Malini. So, don't see it negatively. Earlier, Lalu Yadav had also given a similar example. We respect Hema Malini: Sanjay Raut, Shiv Sena MP pic.twitter.com/qksjYfR9Vw
— ANI (@ANI) December 20, 2021
काय म्हणाले होते पाटील?
"गेली ३० वर्ष ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्त करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत", असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर आता निषेध व्यक्त केला जात आहे.
"गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखरच चुकीचं विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसांत विसंवाद सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपाला पसंती देईल", असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला होता.