भूखंड लाटण्याचे प्रकार सुरूच

By Admin | Published: May 16, 2016 03:14 AM2016-05-16T03:14:28+5:302016-05-16T03:14:28+5:30

सिडकोचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरूच

The type of plot rolling continues | भूखंड लाटण्याचे प्रकार सुरूच

भूखंड लाटण्याचे प्रकार सुरूच

googlenewsNext

नवी मुंबई : सिडकोचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरूच असून त्याला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड लाटल्याचा प्रकार कोपरखैरणेत उघडकीस आला असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड माफियांकडून राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.
दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर शहरातील इतरही अनधिकृत बांधकामे प्रकाशात आली आहेत. आजतागायत ज्या बांधकामांकडे संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले होते, त्यावरही गत काही दिवसांत कारवाया झालेल्या आहेत. मागील काही वर्षांत नवी मुंबईत सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झालेली असून ती सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर आहेत. त्यामध्ये झोपड्यांसह गगनचुंबी इमारतींचाही समावेश आहे. भूमाफियांकडून सिडको अथवा एमआयडीसीचे भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा देखील वापर केला जात आहे. दिघा प्रकरणात हे उघड झालेले असतानाच कोपरखैरणेत देखील सिडकोचा भूखंड लाटण्यासाठी असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथे रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागेवर दोन वर्षांपासून चार मजली इमारती उभारणीचे काम सुरू होते. काही महिन्यांपूर्वी त्याठिकाणचे बांधकाम झाल्यानंतर संबंधिताने तिथल्या घरांच्या विक्रीला सुरवात केली होती. भूखंड क्रमांक १२७ ते १३८ अशा १२ भूखंडांवर हे चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असताना सिडकोच्या भूमी भूमापन विभागाच्या अथवा अतिक्रमणविरोधी पथकाच्या निदर्शनास आले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर भूखंडावर जुने घर असल्याचे भासवून त्या घराची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेली होती. यानुसार सदर घराच्या पुनर्बांधणीच्या बहाण्याने भूखंड लाटत त्याठिकाणी अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली होती. यानुसार शीतल इंटरप्रायजेसचा देवजी चौधरी याच्यासह ज्यांच्या नावे बनावट घरपट्ट्या बनवण्यात आलेल्या होत्या अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी सिडकोकडून सदर भूखंड वितरीत झाल्याची बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामाला परवानगी देखील मिळवलेली होती. परंतु ही कागदपत्रे बनावट असल्याचे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना कळल्यानंतरही त्यांनी मौन बाळगल्याचे समजते. सदर अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असून परिसरातले इतरही भूखंड भूमाफियांनी लाटल्याचे सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)
।आठ जणांवर गुन्हे
भूखंडावर जुने घर असल्याचे भासवून त्या घराची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेली होती. यानुसार सदर घराच्या पुनर्बांधणीच्या बहाण्याने भूखंड लाटत त्याठिकाणी अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली होती. यानुसार शीतल इंटरप्रायजेसचा देवजी चौधरी याच्यासह ज्यांच्या नावे बनावट घरपट्ट्या बनवण्यात आलेल्या होत्या अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The type of plot rolling continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.