अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 08:16 PM2017-01-31T20:16:25+5:302017-01-31T20:19:18+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात मंगळवारी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 31 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात मंगळवारी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. किरणोत्सव मार्गातील अडथळे, मंदिरातील आर्द्रता यामुळे किरणांची तीव्रता कमी होत गेली आणि सूर्यास्ताआधी ६ मिनिटे किरणे मूर्तीवरून लुप्त झाली.
श्रीअंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. यादिवशी सूर्यकिरणांची प्रखरता तीव्र होती. उत्तरायणात किरणे तिरक्या रेषेत मंदिरात येतात. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी किरणे मंदिर परिसरातील गरुड मंडपात आली. त्यानंतर इथे येईपर्यंत किरणांची तीव्रता योग्य होती. मात्र मंदिरात या काळात प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे तापमान वाढते आणि त्यातून आर्द्रता वाढून किरणांची तीव्रता कमी होतो. त्यामुळे कासव चौकात सूर्यकिरणे आल्यानंतर त्यांची तीव्रता कमी झाली व ती मोजता आली नाहीत.
--------------
सूर्यकिरणांचा प्रवास असा..
महाद्वार रोड : ५ वाजून २० मिनिटे
गरुड मंडप : ५ वाजून ३२ मिनिटे
पितळी उंबरा : ६ वाजून २ मिनिटे
दुसरी पायरी : ६ वाजून १० मिनिटे
तिसरी पायरी : ६ वाजून १३ मिनिटे
कटांजन : ६ वाजून १४ मिनिटे
चरणस्पर्श : ६ वाजून १५ मिनिटे
मूर्तीच्या कमरेपर्यंत : ६ वाजून १७ मिनिटे
(छायाचित्र- आदित्य वेल्हाळ)