उबेरची उच्च न्यायालयात धाव
By admin | Published: June 15, 2017 03:30 AM2017-06-15T03:30:36+5:302017-06-15T03:30:36+5:30
नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ना विरोध करत ओला, उबरच्या सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ना विरोध करत ओला, उबरच्या सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या टॅक्सी चालकांना पाठिंबा दर्शवत उबर या कंपनीनेही राज्य सरकारच्या नव्या नियमांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नव्या नियमांनुसार, सध्याच्या परवान्यावर अॅप-बेस्ड टॅक्सी शहरातील रस्त्यांवरून धावू शकत नाही. मुंबईत टॅक्सी चालवायची असेल तर टॅक्सी मालकांना नवीन परवाना घ्यावा लागेल. मात्र त्यासाठी दहापट जास्त शुल्क भरावे लागेल. हे शुल्क चालकांना/ मालकांना परवडण्यासारखे नाही, असे सहा टॅक्सी चालकांनी याचिकेत म्हटले आहे. उबरनेही यास पाठिंबा दिला आहे.
गेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उबर व ओला या कंपन्यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले होते. टॅक्सी चालकांचे जर नुकसान होत असेल तर कंपन्यांचेही नुकसान होणार आहे, असे म्हणत न्यायालयाने कंपन्यांनाही प्रतिवादी करण्यास सांगितले होते. मात्र उबरने प्रतिवादी होण्याऐवजी न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे असल्याचे म्हणत सुनावणी तहकूब केली.