न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:33 AM2022-08-05T06:33:07+5:302022-08-05T06:33:18+5:30
सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून केंद्राकडे नावाची शिफारस
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाचे भावी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रमणा हे सरन्यायाधीश पदावरून येत्या २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लळीत हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. ते येत्या ८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६५व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असून, त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असेल.
सर्वोच्च न्यायालयातील न्या. उदय लळीत यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला. १९८३ पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयात ते वकिली करीत होते. त्यानंतर ते दिल्लीला आले. तिथे सर्वोच्च न्यायालयातील उत्तम वकील म्हणून ते नावारूपाला आले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.
सेवाज्येष्ठतेत लळीत यांच्यानंतर न्या. चंद्रचूड यांचा क्रमांक
सेवाज्येष्ठतेत न्या. उदय लळीत यांच्यानंतर न्या. धनंजय चंद्रचूड यांचा क्रमांक लागतो. चंद्रचूड यांचे वडील न्या. यशवंत चंद्रचूड यांनी १९७८ ते १९८५ या कालावधीत सरन्यायाधीशपद भूषविले होते.
१९९१ साली सरन्यायाधीश झालेल्या न्या. कमल नारायण सिंह यांना सर्वांत कमी म्हणजे १७ दिवसांचा कालावधी मिळाला होता.