उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...
By हेमंत बावकर | Published: April 18, 2024 04:04 PM2024-04-18T16:04:38+5:302024-04-18T16:06:56+5:30
Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली.
- हेमंत बावकर
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. हे पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा घडले आहे. तेव्हाही सामंत बंधुंनी कच खाल्ली होती आणि खासदारकीची जागा नारायण राणेंचे थोरले पूत्र निलेश राणेंना सोडली होती.
गोष्ट २००९ ची. तेव्हा कोकणात नाही म्हणायला बऱ्यापैकी राष्ट्रवादीची ताकद होती. या मतदारसंघात दोन राष्ट्रवादीचे आमदार होते. कणकवलीत राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी प्रस्थ होते. देवगडातही होते. नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते. तर सामंत बंधू राष्ट्रवादीत. तेव्हा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ कोण लढविणार यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी उदय सामंत यांना दावेदारी सांगा, ही सीट आपल्याला लागेल असे सांगितले होते. अनेकदा आग्रह करूनही उदय सामंत यांनी तेव्हा माघार घेतली होती. व ही सीट निलेश राणेंना सोडली होती. पुढे निलेश राणे या मतदारसंघातून खासदार झाले. तेव्हा कच खाल्ली नसती तर कदाचित सामंत बंधुंपैकी एक खासदार झाले असते.
यानंतर दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले. संदेश पारकर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असल्याने नारायण राणेंसोबत आले. वैभव नाईक शिवसेनेत गेले. किरण सामंत व उदय सामंत शिवसेनेत आले. तशीच संधी आता किरण सामंतांना चालून आली होती. पार बांद्यापर्यंत किरण सामंत यांचे बॅनर गेल्या काही वर्षांपासून लागलेले दिसत होते. ही जागा शिवसेनेची होती. शिंदेंनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला आणि सामंतांना तेच दावेदार असल्याचे वाटू लागले होते.
मुंबई-गोवा हायवे असो की अन्य गावा गावात किरण सामंतांचे बॅनर दिसत होते. किरण सामंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यामुळे त्यांचे तिकडे येणे जाणे वाढले होते. रत्नागिरीत व्यवसाय आणि पसारा असल्याने त्यांच्यासाठी वातावरण अनुकुल ठरले होते. यामुळेच दोघेही बंधू यावेळी उमेदवारीसाठी आग्रही होते. २०१४, २०१९ मध्ये निलेश राणेंचा पराभव झाल्याने व ही जागा मुळची शिवसेनेचीच असल्याने सामंतांनी आग्रह करण्यास सुरुवात केली होती. परंतु, अचानक आज त्यांनी दावा सोडल्याचे जाहीर केले. यामागे किरण सामंतांना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द भाजपाकडून मिळाल्याची चर्चा आहे. कदाचित राजापूर मतदारसंघातून किरण सामंतांना विधानसभेचे तिकीट मिळण्याचे व तिथे राणेंचे समर्थन मिळण्याचा शब्द मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.