"वैभव नाईकांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी ५० लाख रुपये दिले"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:56 PM2022-08-16T15:56:48+5:302022-08-16T15:58:13+5:30
शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत असा आरोप राऊतांनी केले.
रत्नागिरी - सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक यांना पाडण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ५० लाख रुपये देत स्वत:च्या पक्षातील उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि त्यांच्या लोकांना पोसण्याचं काम उदय सामंतांनी केले. आईबापाची शपथ घेऊन सांगावं नाही केले असा इशाराच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सामंतांना देत गंभीर आरोप केले आहे. वैभव नाईक, उदय सामंत हे शिवसेना आमदार आहेत तर विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. सध्या उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत.
विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत. राणे आणि त्यांना माणसांना पोसण्याचं काम त्याने केले. वैभव नाईक स्वत:च्या पक्षाचे असतानाही विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्याला आर्थिक मदत करण्याचं काम उदय सामंत यांनी केले. ५० लाख रुपये विरोधी उमेदवाराला दिले असा गंभीर आरोप उदय सामंतावर केला.
तर विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत. ते खरे असतील कुणी माझ्याकडून पैसे घेतले. कुणी किती पैसे घेतले हे सांगावं. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. विनायक राऊत हे देशाचे नेते आहेत. काळ आणि नियती राऊतांना उत्तर देईल असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना दिले आहे.
विनायक राऊतांचा सातत्याने हल्लाबोल
भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. त्यावर अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे ४० आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती.
तसेच विनायत राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचं, विनायक राऊत यांनी सांगितलं होतं.