उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:45 PM2023-12-11T12:45:52+5:302023-12-11T12:55:55+5:30
उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपसोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "उदय सामंत यांचा गौप्यस्फोट खोटा आहे. 2014 साली भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली. त्यानंतर भाजपने परत आमच्याबरोबर युती केल्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो. 2019 साली भाजपने दिलेला शब्द पाळला नाही किंबहुना आमच्याशी त्यांची चर्चेची तयारी नव्हती. त्यामुळे भाजपबरोबर सरकार बनवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. कारण ते सरकार बनवायलाच तयार नव्हते", असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मंत्री उदय सामंत हे खोटं बोलत आहेत. उदय सामंत यांना पक्षात्तराचा अनुभव आहे, पण त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर आमचं सरकार स्थापन झालं तर ते आमच्या दारात असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही. एवढ्या पुरतंच त्याची राजकीय प्रगल्भता आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं. त्यामुळे ते म्हणत आहेत ते सर्वस्वी खोटं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
याचबरोबर, एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर ते झाले असते, पण त्यांची भूमिका वेगळी असती. पण आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेस लोकं काम करत आहेत. अगदी अजित पवार यांच्यापासून सगळे प्रमुख म्हणजे, दिपील वळसे पाटीलही काम करत आहेत. पण त्यावेळी आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच हेका होता की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनामुळे सुनावणी नागपुरात सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची उलट तपासणी घेतली गेली. यादरम्यान, प्रश्नांना उत्तरं देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करु असे आश्वासन दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.