उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:35 PM2023-05-01T18:35:44+5:302023-05-01T18:36:46+5:30
Ratnagiri Barsu Refinery: शरद पवारांना भेटायचे हे आधीच ठरले होते. त्यानुसार चर्चा केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
Ratnagiri Barsu Refinery: गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध करणारे आणि आंदोलकांचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतही उदय सामंत यांनी सविस्तर माहिती दिली.
बारसू रिफायनरी येथील आंदोलकांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार शरद पवार यांना भेटण्याचे ठरले होते. तेथील वस्तूस्थिती काय आहे, हे शरद पवार यांना सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
शरद पवार यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेतला
हे फक्त मातीपरीक्षण आहे. त्यानंतर कंपनी ठरवेल की प्रकल्प होणार की नाही. नोटीस मागे घेण्यासंदर्भात शासन चर्चा करायला तयार आहे. एक-दोन दिवसांत शंका दूर केल्या जाऊ शकत नाही. संवादाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेतला. शरद पवार हे चारवेळी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत सविस्तर शरद पवार यांना सांगितले आहे. रत्नागिरी येथेही एक बैठक झाली. खासदार विनायक राऊत उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढा, असे त्यांनी म्हटले आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, बारसू या रिफायनरी प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. काही शंका आंदोलकांनी शरद पवार यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. शासन आंदोलकांच्या प्रमुखांशी बोलायला तयार आहे. स्थानिकांशी बोलूनच पुढील निर्णय घेतला जाईल. कुणासोबतही जबरजस्ती केली जाणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"