Uday Samant : "हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न"; उदय सामंतांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:44 AM2024-02-09T11:44:52+5:302024-02-09T12:17:27+5:30
Uday Samant : उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही" असं म्हटलं आहे.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. याच दरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. "हे ठाकरे गटातील गँगवॉर, सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं" असं म्हणत गंभीर आरोप केला आहे.
उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही. अशा घटना घडू नयेत म्हणून नक्कीच शासन पुढाकार घेईल. त्याच्यावर कारवाई करेल" असं म्हटलं आहे. तसेच "फेसबुक लाईव्ह, संभाषण पाहिलं असेल. माजी नगरसेवक आणि मॉरिसने भविष्यात एकत्र काम करण्याची शपथ घेतली. त्यानंतर कायमच सकाळी बोलणाऱ्यांनी एक फोटो ट्विट केला."
"फोटोमध्ये मॉरिस शिंदे साहेबांना नमस्कार करताना दिसत आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काही लोकांनी सुरू केला आहे. सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं. त्याने आपल्या अनेक बॅनरमध्ये मला उबाठा आणि शिवसेना मोठी करायची असल्याचं म्हटलं आहे. मी जबाबदारीने सांगतोय की कालचं हे गँगवॉर हे उबाठा गटातील आहे. कारण एकमेकांच्या कॉम्पिटीशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार... यामध्ये हे घडलंय, हे दुर्दैवी आहे."
"एखाद्या नेत्याच्या घरात असं घडू नये ही एकनाथ शिंदेंची देखील प्रामाणिक इच्छा आहे. आमची देखील इच्छा आहे म्हणून या कठीण प्रसंगात घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. असं असताना राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदेना त्यामध्ये आणायचं ही प्रवृत्ती वाढते आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो" असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.