उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:53 IST2025-01-20T12:51:57+5:302025-01-20T12:53:04+5:30

जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे असं सांगत सामंत यांनी विजय वडेट्टीवारांबाबत गौप्यस्फोट केला. 

Uday Samant Will leave Eknath Shinde and Joined BJP? Uday Samant reacts to Sanjay Raut, Vijay Wadettiwar statement | उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

मुंबई - राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच पुन्हा एकदा महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. याच नाराजीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी गेलेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच नवा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांच्या नेतृत्वात सेनेचे २० आमदार भाजपात जाऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे. त्यावरच दावोस दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्री उदय सामंत म्हणाले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमाला मी दावोसला पोहचलोय. याठिकाणी संजय राऊत यांनी माझ्याबाबतीत केलेलं विधान मी ऐकलं. हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यात मी सहभागी होतो. त्यातूनच मला राज्याचे २ वेळा उद्योगमंत्रिपद मिळाले याची मला जाणीव आहे. सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनात मला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मी कधीच विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुणीही वाद लावण्याचा केविळवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच विजय वडेट्टीवार यांनीही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मीदेखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालोय, तुम्हीही सर्वसामान्य कुटुंबातून आला आहात. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असताना त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र करू नका. तुम्हीही भाजपात येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची किती वेळा भेट घेतली याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. परंतु काही राजकीय पथ्य मी पाळतो. त्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कुणी करू नये. जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे. या विधानाचा मी निषेध करतो. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो आणि भविष्यात ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. त्यामुळे अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही. यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमजही होणार नाहीत असा टोला मंत्री सामंत यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना लगावला. 

Web Title: Uday Samant Will leave Eknath Shinde and Joined BJP? Uday Samant reacts to Sanjay Raut, Vijay Wadettiwar statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.