उदय सामंत इकडचा एबी फॉर्म घेतील अन् भाजपात उडी मारतील; विनायक राऊतांनी केली केसरकरांवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:10 PM2024-01-03T13:10:18+5:302024-01-03T13:10:55+5:30
बाडगा आणि कोडगा असतो तसे हे दोघे आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये उडी मारून आपला स्वार्थ या दोघांनी साधला आहे. - खासदार विनायक राऊत.
उद्योग मंत्री पद सांभाळल्यापासून सामंत त्यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचे काम केले आहे. लाचारी करणे या पलीकडे उदय सामंत काही करु शकत नाहीत. पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला जाण्यामागे जर तुम्ही आदित्य ठाकरेंचे नाव घेत असाल तर सामंत यांच्यासारखा असा निर्बुद्ध मंत्री या राज्याला या अगोदर मिळाला नाही, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. याचबरोबर केसरकरांवरही टीका केली आहे.
उदय समंत यांचा फील्डिंग लावायचा नेहमीचा धंदा आहे. ते यावेळी सुद्धा शिंदे गटाचा एबी फॉर्म घेतील आणि उडी भाजपमध्ये मारतील, असा टोलाही राऊत यांनी हाणला. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघे बाडगे आहेत. बाडगा आणि कोडगा असतो तसे हे दोघे आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये उडी मारून आपला स्वार्थ या दोघांनी साधला आहे. आदित्य ठाकरेंचे नाव घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाहीय, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या लोकांना आम्ही घरी बसवणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार इथे आम्ही निवडून आणणार आहोत असे सांगताना राऊत यांनी महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे ३० खासदार निवडून येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.
महायुतीचा दावा नक्कीच फोल ठरेल काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल. तिकीट वाटपाचा जेव्हा विषयी येईल तेव्हा हे सर्व एकमेकांच्या उरावर बसतील. एकमेकांच्या पक्षाला संपवण्याचा हे प्रयत्न करतील. देवेंद्र फडणवीस यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. कारण त्यांना मुख्यमंत्री पदावरून हाकलल्यानंतर मागचे काही आठवत नाहीय. त्यांनी यापूर्वीची पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी यांची भाषणे त्यांनी ऐकावीत, असा सल्ला राऊत यांनी दिला.