उदयसिंगराव गायकवाड यांचे निधन
By Admin | Published: December 3, 2014 03:29 AM2014-12-03T03:29:37+5:302014-12-03T03:29:37+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी मंत्री उदयसिंगराव नानासाहेब गायकवाड (८४) यांचे मंगळवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी मंत्री उदयसिंगराव नानासाहेब गायकवाड (८४) यांचे मंगळवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्या गायकवाड यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव, सून व जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती शैलजादेवी तसेच निर्मला, ऊर्मिला, डॉ. शर्मिला व यशोमती या मुली व रणवीर, युद्धवीर अशी नातवंडे असा मोठा परिवार आहे. गायकवाड यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद भूषविले होते. १९८० मध्ये त्यांनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यानंतर सलग पाचवेळा १९९८ पर्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. उत्कृष्ट लेखक असलेल्या गायकवाड यांची ‘कथा बारा अक्षरांची’ ही आत्मकथा, तर ‘ट्रॉफीज’ हे शिकारकथांवर आधारित अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.