उदयनराजेंसह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा!
By Admin | Published: February 23, 2017 04:22 AM2017-02-23T04:22:52+5:302017-02-23T04:22:52+5:30
जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे झालेल्या राजकीय धुमश्चक्रीप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला
सातारा/मेढा : जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे झालेल्या राजकीय धुमश्चक्रीप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून खा. उदयनराजे भोसले आणि वसंत मानकुमरे यांच्यासह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पोलिसांनी मानकुमरे व त्यांच्या चिरंजीवाला पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केली.मेढा येथील मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. चारशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा जावळी तालुक्यात तैनात करण्यात आला होता.
खा. उदयनराजे यांचे समर्थक अजिंक्य मोहितेने पत्नीच्या गळ््यातील ८ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार वसंत मानकुमरे यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी उदयनराजेंसह अजिंक्य मोहिते, गणेश जाधव, किशोर शिंदे आदी ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. वसंत मानकुमरेंसह ३५ ते ४० जणांनी हल्ला करून गाडीची तोडफोड तसेच गळ्यातील चेन आणि २० हजारांची रोकड हिसकावून नेली. तर स्वप्नीलने गळ्याला गुप्ती लावली. जयश्री मानकुमरे यांनी थोबाडीत मारली, अशी तक्रार अजिंक्य मोहितेने दिली. पोलिसांनी स्वप्नील, जयश्री व वसंत मानकुमरे यांच्यासह ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
पिता-पुत्राविरोधात पोलिसांकडूनच गुन्हा
खर्शी बारामुरे येथील मतदान केंद्रावर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न तसेच पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे तसेच त्यांचा मुलगा स्वप्नील याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली.
खर्शी बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मानकुमरे समर्थकांनी दगडफेक केली होती. त्यामध्ये पोलिसांच्या गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तसेच दोन पोलीस जखमी झाले होते.