उदयनराजे भोसले स्वतःहून सातारा पोलीस स्टेशनमध्ये हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 09:25 AM2017-07-25T09:25:55+5:302017-07-25T12:15:19+5:30
खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झालेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 25 - खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर मंगळवारी ( 25 जुलै ) सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झालेत. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.
त्यांच्या विरोधात खंडणी व हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ते साताऱ्याबाहेर होते. फक्त, शुक्रवारी रात्री त्यांनी पोलिसांसमक्ष जोरदार "रोड शो" काढून वेगळेच वातावरण निर्माण केले होते.लोणंद येथील सोना अलाइन्ज कंपनीच्या मालकाची हत्या करण्याचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजेंनी सुरुवातीला सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
तो नामंजूर झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. तेथेही हा अर्ज फेटाळला गेल्यानंतर पोलीस यंत्रणेची हालचाल सुरू झाली.दरम्यान, तब्बल 100 दिवसांनंतर उदयनराजे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले होते. ते आल्याचे समजताच गांधी मैदानाजवळ कार्यकर्त्यांनी हारतुरे घालून त्यांचे स्वागत केले होते.
तसेच राजवाडा परिसरातही फटाके फोडण्यात आले होते. दरम्यान, उदयनराजे यांना अटक होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर दबाव वाढत चालला होता. या प्रकरणात कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे, खासदार राजीव सातव, संभाजीराव भिडे गुरुजी तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयन राजेंना जाहीर पाठींबा व्यक्त केला होता.
दरम्यान, कायद्याचे पालन करण्यासाठी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी नियोजनपूर्वक पावले उचलण्यावर भर देऊ लागले असून राखीव फोर्सही ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
कडक पोलीस बंदोबस्त
शिवघराण्याच्या राजमाता कल्पनाराजे व इतर सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. हे समजताच पोलीस खात्याने शहर पोलीस ठाण्याभोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवला. उदयनराजेंसोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेऊन पोलीस खाते पूर्ण सतर्क झाल्याचे याठिकाणी दिसून आले.