उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 01:07 PM2019-09-16T13:07:58+5:302019-09-16T13:09:14+5:30
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली असताना उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच आधीच्या सरकारने अनेक कामं अडकून ठेवल्याचे त्यांनी सांगितले होते.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले छत्रपती उदयनराजे भोसले लगेच इलेक्शन मोडीवर गेल्याचे दिसून येत आहे. राजेंनी पदावर नसताना साताऱ्यातील विकास कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत होत आहे.
उदयनराजे यांनी त्यांच्या फेसबुकवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आङे. यामध्ये ते म्हणाले की, मागील ४० वर्षांपासून रखडलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीवर काल रात्री उशिरा मंत्रालयातून शिक्कामोर्तब करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले, याचा मनस्वी आनंद आहे. यावेळी उदयनराजे यांनी न विसरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. परंतु, त्यांच्या कामाचा जोर सुरू झाला आहे. मंत्रालयात अडकून पडलेली कामे ते करून घेत आहेत. खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सहाजिकच त्यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी उदयनराजे यांनी लगेचच सुरू केल्याची चर्चा, साताऱ्यात सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली असताना उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच आधीच्या सरकारने अनेक कामं अडकून ठेवल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज लगेच मुख्यमंत्र्यांमुळे सातारा शहराच्या हद्दीचा प्रश्न सुटल्याची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली आहे.