उदयनराजे अज्ञातवासात.. 007 कार मात्र थाटामाटात !

By Admin | Published: July 14, 2017 10:58 PM2017-07-14T22:58:59+5:302017-07-14T22:58:59+5:30

उदयनराजे अज्ञातवासात.. 007 कार मात्र थाटामाटात !

Udayanagaraj unidentified .. 007 Cars in the car! | उदयनराजे अज्ञातवासात.. 007 कार मात्र थाटामाटात !

उदयनराजे अज्ञातवासात.. 007 कार मात्र थाटामाटात !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्या तीन महिन्यांपासून सातारकरांसाठी अत्यंत दुर्मिळ बनलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे एका नव्या कोऱ्या कारसह सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. त्यामुळे ‘उदयनराजे अज्ञातवासात.. 007 कार मात्र थाटामाटात !’ अशी टिप्पणीही सातारकरांमधून केली गेली आहे.
खंडाळा तालुक्यातील एका उद्योजकाला मारहाण केल्याचा तसेच त्याला खंडणी मागितल्याचा गुन्हा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या सात सहकाऱ्यांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अशोक सावंत व इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यावेळी नव्वदपेक्षाही अधिक दिवस जामीन न मिळाल्यामुळे अटकेतील आरोपी कोठडीतच होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजेंनी जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला होता. मात्र, मंजूर न झाल्यामुळे उदयनराजे तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळ सातारा जिल्ह्याच्या बाहेरच मुक्कामाला आहेत.
ते एकदा अकस्मातपणे साताऱ्यात येऊन गेल्याचा फोटो सोशल मीडियावर फिरल्यानंतर कोल्हापूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘कोणत्याही परिस्थितीत उदयनराजेंना अटक करूच’ अशी घोषणाही केली होती.
दरम्यान, शुक्रवारी फेसबुकसह इतर सोशल मीडियावर उदयनराजे एका इम्पोर्टेड कारची चावी ताब्यात घेत असतानाचा फोटो व्हायरल होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मीडियावर एकाहून एक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोशल मीडियावर का होईना आपल्या नेत्याचे दर्शन झाले, या भावनेतून आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी याच सोशल मीडियावर ‘007 जय हो’ अशी घोषणा देण्यासही मागे पुढे पाहिले नाही.
उदयनराजे सध्या राष्ट्रवादीचे खासदार असले तरी याच पक्षातील एका नेत्याने त्यांना फौजदारी गुन्ह्यात अडकून ठेवल्याचा आरोपही यापूर्वी केला गेला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक दौरे सातारा जिल्ह्यात झाले. मात्र, याठिकाणीही उदयनराजे उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यांचा हा राजकीय अज्ञातवास लवकरात लवकर संपावा, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी जाहीररित्या व्यक्तही केली आहे.
ही कार म्हणे दमयंतीराजेंसाठी...
शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो पुणे किंवा मुंबईतील एका अलिशान कार कंपनीच्या शोरुममधला असल्याचे सातारकरांच्या तत्काळ लक्षात आले. मात्र, एसयुव्ही किंवा परदेशातील बनावटीच्या स्पोर्टी गाड्या वापरणारे उदयनराजे कारमध्ये कधीपासून बसू लागले, असाही सवाल सातारकरांनी एकमेकांना विचारला. मात्र, काहीजणांनी अधिक खोलात शिरुन शोध घेतला असता उदयनराजे यांची पत्नी दमयंतीराजे यांच्यासाठी ही अलिशान कार विकत घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उदयनराजेंसाठी नेहमीच लकी ठरलेला आवडीचा नंबर 007 या कारलाही मिळाला असून, पासिंग एमएच ११ सीएच असा आहे. ‘सीएच म्हणजे छत्रपती’ अशी टिप्पणीही राजेंच्या एका कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

Web Title: Udayanagaraj unidentified .. 007 Cars in the car!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.