साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:37 AM2024-04-16T11:37:19+5:302024-04-16T11:38:16+5:30
Lok sabha Election 2024 - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी घोषित होण्यास विलंब लागत होता. अशातच मविआनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता दिल्लीहून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा - Udayanraje Bhosale in Satara ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून तिकीट जाहीर झाली आहे. सातारा मतदारसंघात उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रचारालाही लागले होते. गावोगावी भेटी, लोकांशी संवाद सुरू होता. परंतु महायुतीकडून अधिकृतरित्या सातारा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली नव्हती. परंतु आता भाजपाने ही उमेदवारी जाहीर केली आहे.
सातारा मतदारसंघात नुकतेच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते मानले जातात. पक्षफुटीनंतरही शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत कायम राहिले. मात्र याच मतदारसंघात महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यासाठी राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. मात्र सातारा मतदारसंघाची उमेदवारी घोषणा होण्यास विलंब लागत होता.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 12वीं सूची में निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/VdGHChERQa
— BJP (@BJP4India) April 16, 2024
साताऱ्याची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे राहणार की भाजपा लढवणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले यांनी कमळ चिन्हाशिवाय इतर चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती होती. त्यामुळे या जागेवरून महायुतीत चर्चा सुरू होती. अखेर ही जागा महायुती भाजपाकडे गेली. भाजपाने या मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. परंतु काही महिन्यातच त्यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.
उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी या मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. श्रीनिवास पाटील आणि भाजपाकडून उदयनराजे भोसले यांच्यात ही लढत झाली. मात्र त्या लढतीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजेंची राज्यसभेवर निवड केली. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली. मात्र त्यांची उमेदवारी घोषित न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र आता ही उमेदवारी जाहीर झाली आहे.