उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 12:08 AM2017-02-22T00:08:54+5:302017-02-22T00:08:54+5:30
गाड्यांची तोडफोड; मानकुमरे यांच्या पत्नीसह पोलिस जखमी; आज जावळी तालुका बंद
मेढा/सायगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास खर्शी बारामुरे, ता. जावळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे यांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर मानकुमरेंच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, आपल्या पत्नीसह कार्यकर्त्यांनाही उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्राला भेट देण्यासाठी जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते परतत असताना उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडे रागाने पाहिल्याचे सांगत संबंधिताने मानकुमरे यांच्या एका कार्यकर्त्याला दांडके घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी उपस्थित असलेले मानकुमरे पुढे सरसावले, तेव्हा बाचाबाचीत एक कार्यकर्ता मानकुमरे यांच्यावर दांडक्याने मारहाण करणार तोच त्यांच्या पत्नी जयश्री मानकुमरे मध्ये पडल्या. यावेळी त्या व त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले.
त्यानंतर मानकुमरे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांभोवती जमला. शेजारी असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यातून दगडे उचलून गाड्यांवर भिरकाविण्यास प्रारंभ झाला. या दगडफेकीत पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)
शिवेंद्रसिंहराजे मेढ्यात तळ ठोकून!
या घटनेची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करहर पोलिस ठाण्यात येऊन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचे आवाहन केले. या घटनेची माहिती काही क्षणात संपूर्ण जावळी तालुक्यात पसरली. त्यामुळे शेकडो कार्यकर्ते करहर पोलिस ठाण्यापुढे जमा झाले. त्यामुळे याठिकाणीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिस मुख्यालयासमोर उदयनराजेंच्या समर्थकांची गर्दी !
खर्शी येथे खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे समजताच साताऱ्यात पोलिस मुख्यालयावर खासदार समर्थक मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. संतप्त कार्यकर्त्यांचा आवेश पाहून पोलिसांनीही मुख्यालयासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उदयनराजे यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन मानकुमरेंवर तत्काळ कारवाईची मागणी केली.
खर्शी येथे खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे समजताच साताऱ्यात पोलिस मुख्यालयावर मंगळवारी रात्री खासदार समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.