उदयनराजे भोसलेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; म्हणाले, "प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी... "
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:51 PM2024-02-19T12:51:16+5:302024-02-19T12:54:32+5:30
Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.
Udayanraje Bhosale : (Marathi News) सातारा : येत्या काही दिवसांत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काही अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना तुम्ही आव्हान देणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले म्हणाले, "लोकशाही आहे, या लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार नाही. मला याबाबत फार बोलायचे नाही". यानंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना, तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे का? असा थेट प्रश्न विचारला. यावर 'माझी इच्छा जाऊ दे, तुमची इच्छा काय आहे?', असा प्रतिप्रश्न केला. मात्र, पुन्हा पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही."
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि २०१९ साली भाजपाकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आता आगामी निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपाचे उदयनराजे भासले अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.