VIDEO- उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स, रुग्णांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 01:05 PM2018-01-22T13:05:21+5:302018-01-22T13:10:46+5:30
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सातारा- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, सिव्हिलमध्ये उपचार घेण्याच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या या आरोपींचा व्हिडीओ चक्क त्यांच्याच एका अतिउत्साही कार्यकर्त्याने काढल्याचंही स्पष्ट झालं आहे.
‘सुरुचि’ बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी दोन्ही राजे गटांचे काही कार्यकर्ते अटकेत असून, त्यांच्या जामिनाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण आजारी असल्याचे दाखवत या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आसरा घेतला आहे. दरम्यान, काही आरोपींना अंतिम जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच शासकीय रुग्णालयातील या राजकीय आरोपींची ‘तब्येत’ क्षणार्धात खडखडीत झाली. त्यांनी मोबाईलवरील गाणे ब्ल्यू टूथ स्पिकरवर घेऊन मस्तपैकी नाचण्यास सुरुवात केली.
सिव्हिलच्या एका रुममध्ये एकत्र जमलेल्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंद व्यक्त करताना भलताच धुडगूस घातला. यातील जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल होता. रुग्णालयाच्या खोलीतील साहित्य पाहताना हे कार्यकर्ते याठिकाणी उपचारासाठी आले की पिकनिकसाठी.. असा प्रश्न पडत होता. टी-शर्ट अन् बर्मुडा घालून जोरजोरात नाचणाºया या कार्यकर्त्यांचे शूटिंग काढण्याचा मोहही यातीलच एका अतिउत्साही सहकाऱ्याला आवरता आला नाही. आपल्या मोबाइलमधून काढलेली ही क्लिप त्याने नंतर बाहेरच्या एका मित्राला व्हॉटसअॅपवरून पाठवली. मित्रालाही याचा इतका आनंद झाला की त्याने चक्क वेगवेगळ्या ग्रुपवर हा व्हिडीओ फिरवला.
त्यानंतर हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. पोलीस खात्याच्या हातीही हा व्हिडीओ लागला आहे. आजारी असल्याच्या नावाखाली कोठडीऐवजी शासकीय रुग्णालयात आरामात जगणाऱ्या या कार्यकर्त्यांचा ‘राजकीय आजार’ पळविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार अधिकारी करीत आहेत. दरम्यान, या आरोपींच्या खोट्या आजाराला शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मंडळीच जबाबदार असल्याची तक्रार खुद्द पोलीस खात्याने यापूर्वी आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. तसंच न्यायालयातही याबाबतचे एक पत्र दिलं होतं. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांने कार्यकर्त्यांचा काढलेला धिंगाण्याचा व्हिडीओ न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.