उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात धुमश्चक्री, ‘सुरुचि’वर हवेत गोळीबार, ३०० जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:02 AM2017-10-07T05:02:10+5:302017-10-07T05:02:56+5:30
सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या राड्याचे रुपांतर शुक्रवारी मध्यरात्री एकमेकांवर बंदूक रोखण्यापासून हवेत गोळीबारापर्यंत गेले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुचि बंगल्यावर रात्री साडेबारा वाजता खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी बंदुकीतून हवेत आठ राऊंड फायर केल्याने गोंधळ आणखीच उडाला. दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी उदयनराजे तसेच शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांवर मारामारी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आनेवाडी टोलनाका हस्तांतरण करण्याच्या मुद्द्यावरून या दोन राजेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. ज्या नवीन कंपनीकडे हा ठेका जाणार आहे ते सर्व शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे असल्याने त्यांच्यामुळेच हस्तांतरण होत असल्याची भावना उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातच उदयनराजेंनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह या नाक्यावर आपल्या खास स्टाईलने एंट्री मारुन चार तास वाहनांना टोल फ्री वाट करुन दिली. रात्री बाराच्या सुमारास हस्तांतरणाची प्रक्रिया होणार होती. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे नाक्यावर येतील असा कयास होता. परंतु, पोलिसांनी समजूत काढल्याने शिवेंद्रसिंहराजे आनेवाडी टोलनाक्यावर गेले नाहीत.
त्यानंतर मध्यरात्री साडेबाराला उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवेंद्रसिंहराजेंचा सुरुचि बंगला गाठला. शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे बंगल्याच्या गेटवर उभे होते. उदयनराजे दोनशे कार्यकर्त्यांसमवेत शिवेंद्रसिंहराजेंच्या बंगल्यात शिरले. धुमाळ यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उदयनराजेंनी त्यांना धक्का देऊन बाजूला सारले. याचवेळी शिवेंद्रसिंहराजेंचेही कार्यकर्ते तेथे आले. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की करू लागल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळताच एकाने बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या. मोठा आवाज झाल्याने कार्यकर्ते पळू लागले. त्यानंतर काही वेळातच आणखी फाटऽऽफाट असा आवाज आला. सहा राऊंड हवेत फायर झाले. हा प्रसंग ओळखून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविल्याने अनर्थ टळला.