"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:13 IST2025-04-11T18:12:21+5:302025-04-11T18:13:49+5:30
"महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दीली? कुठल्या राजाने राजसत्तेने नाही दिली, तर आगरी, कोळी, भंडारी, मुंबईतील काबाडकष्ट करणाऱ्या, सामान्य जनतेने कोली वाड्यात दिली. या महाराष्ट्राच्या समाजमनाचा हा अपमान आहे. यामुळे उदयनराजे, थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला शोभेल असे वक्तव्य आपण करा."

"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी, महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचलले असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. त्यांच्या या विधानावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे, थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला शोभेल, असे वक्तव्य आपण करा, असे हाके यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, "मी सर्वप्रथम उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो. हा निषेध मी छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून व्यक्त करतो. कारण, महाराष्ट्र आणि छत्रपती म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेचे आणि या शब्दाचे वेगळे नाते आहे. मात्र, असे बेजबाबदार पणाचे आणि कुठलाही अभ्यास, कुठलाही अभ्यास, समाज शास्त्रज्ञ यांचा सल्ला न घेता, एका लोकसभेतील सदस्याने असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करू नये, असे आमचे मत आहे."
आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना, त्या जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन, हे एवढ्या बेजबाबदारपणे कसे वागू शकतात? असा सवाल करत हाके म्हणाले, "या महाराष्ट्र आणि देशभरात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, त्यांचे महिला शिक्षणासंदर्भातील कार्य, त्यांचे दलितांसाठीचे कार्य आणि त्यांचे शेतकऱ्यांसाठीचे कार्य, या महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला माहीत आहे. यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो."
"उदयन राजे यांनी ज्या दिवशी, महामानवांसंदर्भात बोलणाऱ्या माणसांविरोधात कायदा आणावा, अशी मागणी केली होती, तेव्हा आम्ही, त्यांचे स्वागत केले की, हो हा माणून बरोबर बोलतोय. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दीली? कुठल्या राजाने राजसत्तेने नाही दिली, तर आगरी, कोळी, भंडारी, मुंबईतील काबाडकष्ट करणाऱ्या, सामान्य जनतेने कोली वाड्यात दिली. या महाराष्ट्राच्या समाजमनाचा हा अपमान आहे. यामुळे उदयनराजे, थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला शोभेल असे वक्तव्य आपण करा," असेही हाके यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते उदयन राजे? -
उदयनराजे म्हणाले होते, "एका दृष्टीकोनातून पाहिले तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचलले असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले."