“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:56 AM2023-06-22T07:56:37+5:302023-06-22T07:57:22+5:30

मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे.

uddhav balasaheb thackeray group slams pm modi govt over bjp leader statement | “मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

googlenewsNext

Thackeray Group Vs Modi Govt: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. धनखड बोलत असताना त्या मंचावर गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनहर खट्टर वगैरे तालेवार मंडळी उपस्थित होती. यावरून ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

हिंदुत्व हे आता धर्मांधता व बुरसटलेल्या विचारांकडे ढकलले जात असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे. कोविडची ‘लस’ मोदींनी बनवली, हरयाणातील मुलींची उंची मोदी सत्तेत आल्यामुळे वाढली अशा प्रकारचे ‘बोल’ हे मेंदूचा ताबा अंधश्रद्धा व अंधभक्तीने घेतल्याचा परिणाम आहे. जेव्हा विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. 

विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे

भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. मध्य प्रदेशातील एक बाबा धीरेंद्र शास्त्री की कोणी हा भाजपच्या प्रचाराचा झेंडा घेऊन फिरतो आहे. या बाबाची वक्तव्येही अशीच जुनाट वळणाची. हेच जर तुमचे हिंदुत्व असेल तर ते तुमचे तुम्हालाच लखलाभ ठरो. मोदी युगात अशा बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण अशा विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे, अशी टीका करण्यात आली आहे. 

मोदी युगात बेरोजगारी, महागाई वाढली

मोदी युगात बेरोजगारी, महागाई वाढली. प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या त्यांच्या घोषणा हवेत विरल्या. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, आरोग्य, शिक्षण महागले. मणिपुरात हिंसाचाराची आग भडकली आहे. त्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारने का गाठू नये? मोदी युगात भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने टोकाची उंची गाठली. महिलांच्या उंचीपेक्षा या भ्रष्टाचाराची उंची दाहक आहे. चीन लडाखच्या सीमा पार करून आमच्या हद्दीत घुसला, पण एक इंच जमिनीवरही पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा अद्यापि आपल्या राज्यकर्त्यांनी ठामपणे घेतल्याचे दिसत नाही. भारताला तोडण्याचे आसुरी शक्तींचे प्रयत्न आहेत असा हल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला, पण या देशात भागवत वगैरेंच्या विचारांचे वारस असलेले सरकार व पंतप्रधान आहेत. मोदी यांची ख्याती विश्वाचे नेते अशी आहे, पण कोविडवरील लस पंतप्रधान मोदी यांनी शोधून काढली असे भाजपचे नेते सांगतात व अंधभक्त त्यावर टाळ्या वाजवतात. हा त्यांचा नवीन धर्म, असा घणाघात करण्यात आला आहे. 

दरम्यान, गाय ही माता नसून एक उपयुक्त पशू आहे हा वीर सावरकरांचा विचार. मोदी युगात वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत, पण त्यांना वीर सावरकरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करायचा आहे. मोदी युगात देशाच्या जनतेची प्रतिष्ठा, मानवी हक्क, संविधान, लोकशाहीची उंची किती वाढली याचे मोजमाप होणे खरे म्हणजे गरजेचे आहे. हिंदू धर्म हा संकुचित नाही, पण मोदी युगात हिंदुत्व कमालीचे संकुचित व भयग्रस्त झाल्याचे दिसत आहे. खरे तर हिंदू धर्म हा एकमेव धर्म असा आहे की, जो विज्ञानाशी सुसंगत दिसतो. हिंदू धर्म हा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मवाद यांचा मिलाफ आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. 


 

Web Title: uddhav balasaheb thackeray group slams pm modi govt over bjp leader statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.