उद्धव-चंद्रकांतदादांमध्ये घडला शब्दांविना संवाद
By admin | Published: March 4, 2017 01:00 AM2017-03-04T01:00:18+5:302017-03-04T01:00:18+5:30
दुरावा कायम : बेळगावमध्ये नजरानजर
कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरचा मुक्काम रद्द करून मुंबईला जाण्यासाठी बेळगावला निघाले. तेथून ते विमानाने मुंबईला जाणार होते. गाड्या सुसाट बेळगावच्या विमानतळावर आल्या. गाडीतून उद्धव ठाकरे खाली उतरले तर समोर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ‘कसं काय, कुठून आलात.’ बाकी चर्चा न करता ठाकरे विमानतळावर गेले आणि चंद्रकांतदादा कोल्हापूरकडे येण्यासाठी रवाना झाले. दोघांमधील ‘शब्दां’विना संवादाची चर्चा शुक्रवारी कोल्हापुरात सुरू होती.
ठाकरे गुरुवारी विवाह समारंभासाठी आले होते. ते मुक्कामही करणार होते. मात्र, नियोजनात बदल होऊन त्यांनी रात्रीच मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरला उतरलेले विमानही बेळगावला गेले होते. विवाह समारंभानंतर ठाकरे थेट बेळगावला जायला निघाले. गाड्या बेळगाव विमानतळावर येताच अचानक समोर चंद्रकांतदादा पाटील दिसले. मात्र, एकमेकांची मिनिटभर चौकशी करून ठाकरे आत गेले तर पाटील बाहेर पडले.
इकडे शुक्रवारी दिवसभर ठाकरे यांनी चंद्रकांतदादांना टाळल्याची चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या सत्तेचा तिढा सुटला नसताना या दोघांमध्ये कोल्हापूरमध्ये काही चर्चा होईल असे वाटत असतानाच ठाकरे यांचा मुक्काम रद्द झाल्याने ‘भेट झाली मात्र चर्चा नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली.
भाजप-सेना युती २०० टक्के होणार
बेळगाव विमानतळावर शुक्रवारी रात्री उद्धव आणि आमची भेट झाली. अतिशय चांगल्या वातावरणात आम्ही एकमेकांची चौकशी केली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांनी मला टाळल्याच्या चर्चेत काही तथ्य नाही. इतकेच नव्हे तर मुंबईत भाजप-शिवसेनेची २०० टक्के युती होणार याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.