उद्धवमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता नाही -नारायण राणे
By admin | Published: September 23, 2014 05:01 AM2014-09-23T05:01:41+5:302014-09-23T08:43:58+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अलीकडेच मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे हळूवारपणे बोलू लागले आहेत
अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अलीकडेच मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे हळूवारपणे बोलू लागले आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदासाठी कर्तृत्ववान आणि क्षमता असलेली व्यक्ती हवी. उद्धव हे तासभरही काम करू शकत नाहीत़ थोडे पायी चालले की, लगेच दमतात. त्यामुळे त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाची जराही क्षमता नाही, अशी टीका काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
राणे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ खोटे बोलून लोकांची भलामण केली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेचा खरा मुखवटा जनताच फाडेल, असा आशावाद व्यक्तकरीत पंकजा मुंडे यांनी काढलेली संघर्ष यात्रा ही काँग्रेसविरोधी नव्हे तर भाजपाविरोधी होती, अशी उपहासात्मक टीका राणे यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आघाडी व्हावी, ही आपली वैयक्तिक इच्छा आहे. काँग्रेसने १२४ जागा देऊ केल्या आहेत. आघाडी झाली नाही तर काँगे्रसने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राणे यांनी अजित पवार यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला काँग्रेसचा विरोध नाही, पण ही मागणी केवळ सत्तेसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)