युतीसाठी उद्धव यांनी दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:34 AM2019-01-29T05:34:24+5:302019-01-29T06:37:45+5:30
स्वाभिमान गहाण ठेवून युती करू नका; शिवसेना खासदारांची भावना
- यदु जोशी
मुंबई : भारतीय जनता पार्टीने युतीबाबत ठोस प्रस्ताव देऊन १५ दिवसांत काय तो निर्णय करावा; अन्यथा आम्ही वेगळे लढण्यास मोकळे आहोत, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपाला दिला. स्वबळावर लढलो तर काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी सगळी ताकद उभी करेन, असा दिलासाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिला.
शिवसेना खासदारांची सोमवारी ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी उद्धव म्हणाले, भाजपावर विश्वास तरी कसा ठेवायचा? राज्यात आणि केंद्रात आम्हाला त्यांनी योग्य वाटा दिला नाही. जे कबूल केले तेही दिले नाही. आता ते काय देणार आहेत हे त्यांनी टीव्हीसमोर येऊन सांगावे. उगाच बातम्या पसरवू नयेत. आमच्या अटी मान्य केल्या, तरच युती करू. अन्यथा, स्वबळावर लढण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाने निवडून आलेल्या पाच जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. आम्ही तर आमच्या हक्काच्या जागा मागत आहोत, असे सांगत उद्या युती झाली तर त्याचे समर्थन काय द्यायचे ते मी पाहीन, तुम्ही त्याची काळजी करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांना सांगितले. आमच्यासाठी तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि तो गहाण ठेवून कदापिही भाजपाशी युती करू नका. आम्ही सगळे तुमच्या मागे उभे आहोत, अशी ग्वाही शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या वेळी उद्धव ठाकरे यांना दिली.
माझी लढाई तुमच्यासाठी आहे
मला आमदार, खासदार वा मुख्यमंत्री व्हायचे नाही. बाळासाहेबांप्रमाणे मीदेखील पद घेणार नाही. मी राजकारणात आज आहे आणि उद्या नाही. मी आदित्यला पुढे करतोच आहे. माझी लढाई तुमच्यासाठी आहे.
- उद्धव ठाकरे
कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर खुशाल जा. तुमच्यापैकी काही लोक काय बोलतात हे मला कळले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, साम-दाम-दंड-भेद अशी सगळी शक्ती पणाला लावून मी लोकसभेला सामोरे जाण्याचे ठरविले आहे, अशी भावना उद्धव यांनी बैठकीत व्यक्त केली.