उद्धव यांचे आदेश शिंदेंकडून धाब्यावर?
By admin | Published: July 15, 2017 02:07 AM2017-07-15T02:07:31+5:302017-07-15T02:07:31+5:30
ठाकरे यांचा आदेश धाब्यावर बसवून शिंदे यांच्याकडून जमीन खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) उद्या शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला जाहीर विरोध करून याकरिता जमीन संपादन रोखण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना केली असतानाही ठाकरे यांचा आदेश धाब्यावर बसवून शिंदे यांच्याकडून जमीन खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) उद्या शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे शनिवारी (आज) शिंदे यांच्या उपस्थितीत खरेदी प्रक्रियेचा कार्यक्रम समारंभपूर्वक पार पडणार आहे. जमीन संपादनास विरोध करणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीने या सोहळ्याला विरोध केला असून ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने हा लढा लढत असून वेळ पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मागील महिन्यात २९ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात जोपर्यंत शेतकऱ्यांचे हित साधले जात नाही, तोपर्यंत समृद्धी महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. याच भाषणात त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना आपण याबाबत स्पष्ट आदेश दिल्याचे नमूद केले आहे. मग, जर पक्षप्रमुखांचे समृद्धी महामार्ग न होण्याचे आदेश असतील, तर शिंदे हे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून उद्या जमिनीच्या नोंदणी सोहळ्याला हजर राहणार आहेत का? नागपूर येथे कालच्या कार्यक्रमालाही ते कुणाच्या आदेशावरून हजर राहिले, असे सवाल केले जात आहेत.
कार्यक्रमाचे पूर्वसंध्येला ठिकाण बदलले
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शहापूर येथे हा कार्यक्रम उद्या होणार होता. तसे मेसेजही प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींना करण्यात आले होते.
मात्र, या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी आपली नाराजी प्रकट करून तो उधळून लावतील या भीतीने बिथरलेल्या रस्तेविकास महामंडळाने आता हा कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे निश्चित केले आहे.
मात्र, तरीही शेतकरी त्यात आठकाठी करणार की यापासून चार हात दूर राहणार, याबाबतही औत्सुक्य निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनात सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना विहिरीत जीव द्यायचाच आहे, त्यांनी तो द्यावा. परंतु आम्ही आमचा लढा कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवू.
- बबन हरणे, पदाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती