उद्धव-पवार भेटीने राजकीय तर्कवितर्क , सत्तेबाहेर पडणार की राणेंना रोखण्याची खेळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:53 AM2017-11-08T05:53:02+5:302017-11-08T05:53:16+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे समोर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे समोर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, की नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये, यासाठी आणलेला हा दबाव
आहे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
शिवसेना सत्तेत समाधानी दिसत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दहा दिवसांपूर्वी भेटीला आले होते, असा गौप्यस्फोट खा. पवार यांनी आज कर्जत येथे केला. ते म्हणाले, उद्धव यांच्या वडिलांपासून आमच्यात सुसंवाद आहे. परवाच्या भेटीत आमच्यात बºयाच विषयांवर चर्चा झाली. पण मला ते सत्तेत राहून समाधानी वाटले नाहीत. अर्थात, सरकारचा लगेच ते पाठिंबा काढतील असे नाही. पण जर कुणी सत्तेतून बाहेर पडले तर कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही,अशी गुगलीही पवार यांनी टाकली.
उद्धव-पवार भेटीमागे राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश असल्याची चर्चा सुरू झाली.
त्यावर, ‘मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण तो घाबरट पक्ष आहे’, अशी टीका राणे यांनी केली.
शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस असे एकत्र येऊन जर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला तर पक्षांतर्गत नेत्यांशी आणि समविचारी पक्षांशी बोलूनच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उद्धव-पवारांच्या भेटीवर भाजपामधील एका ज्येष्ठ नेत्याने वेळीच माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना अस्वस्थ होती. त्या वेळीही उद्धव यांनी पवारांची भेट घेतली होती. पृथ्वीराज चव्हाण, मोहनप्रकाश या काँग्रेस नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे, आपण एकत्र यऊन सरकार बनवू असा प्रस्ताव दिला होता. मात्र पवारांनी
तो फेटाळला होता. आता राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून शिवसेनेत
अस्वस्थता असताना नेमकी वेळ साधत पवारांनी ही माहिती माध्यमांना दिल्याचा दावा या नेत्याने केला.
पवारांच्या कथित ‘भेटी’वर शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी
पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यावर ते का बोलत नाहीत, असा सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या
भेटीची गुप्तता १० दिवसांपर्यंत का बाळगली? आजच त्याबाबत आपल्या भाषणात उल्लेख का केला, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
सुरू होती.