‘वंदे मातरम’ला विरोध : देशातून नको, विधानसभेतून हाकला! - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 08:12 AM2017-07-29T08:12:21+5:302017-07-29T08:30:39+5:30
'वंदे मातरम्'वरुन गेले दोन दिवस वादाला तोंड फुटले आहे. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये विधानसभेचे दोन सदस्य अबू आझमी व वारीस पठाण यांचा धर्मांध साप असा उल्लेख करत फटकारले आहे.
मुंबई, दि. 29 - 'वंदे मातरम्'वरुन गेले दोन दिवस वादाला तोंड फुटले आहे. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये विधानसभेचे दोन सदस्य अबू आझमी व वारीस पठाण यांचा धर्मांध साप असा उल्लेख करत फटकारले आहे.
‘‘कोणताही खरा मुसलमान ‘वंदे मातरम’ गाणार नाही’’. या सापोबांनी पुढे असाही डंख मारला आहे की, ‘‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम’ गाणार नाही.’’ पठाण म्हणतात की, ‘‘माझ्या गळय़ावर सुरी ठेवली तरी मी ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही.’’, महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे कायदेमंडळाचे दोन सदस्य अशी राष्ट्रविरोधी भाषा वापरणार असतील तर फडणवीस यांचे कायद्याचे राज्य त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे?, असा प्रश्न उद्धव यांनी सामना संपादकीयमध्ये उपस्थित केला आहे.
विधानसभेने एक प्रस्ताव बहुमताने मंजूर करून दोन्ही आमदारांचे कायमचे निलंबन करावे, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.
#WATCH Verbal spat outside Maharashtra assembly between AIMIM MLA Waris Pathan and BJP MLA Raj Purohit over #VandeMatarampic.twitter.com/bGV34AXIMl
— ANI (@ANI_news) July 28, 2017
काय आहे नेमके सामना संपादकीय?
महाराष्ट्रात विषाला उकळी फुटली आहे. नागपंचमीचा मुहूर्त साधून दोन धर्मांध सापांनी देशविरोधी फूत्कार सोडले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे दोन सदस्य अबू आझमी आणि वारीस पठाण यांनी विषाला अशी उकळी फोडली आहे की, समस्त राष्ट्रभक्तांच्या डोळय़ांतून अंगाराच्या ठिणग्या बाहेर पडाव्यात. आझमी व पठाण यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची पर्वा न करता सांगितले आहे की, ‘‘कोणताही खरा मुसलमान ‘वंदे मातरम’ गाणार नाही’’. या सापोबांनी पुढे असाही डंख मारला आहे की, ‘‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम’ गाणार नाही.’’ पठाण म्हणतात की, ‘‘माझ्या गळय़ावर सुरी ठेवली तरी मी ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही.’’ महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे कायदेमंडळाचे दोन सदस्य अशी राष्ट्रविरोधी भाषा वापरणार असतील तर फडणवीस यांचे कायद्याचे राज्य त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे? या दोघांचे वक्तव्य हा सरळ सरळ न्यायालयाचाही अवमान आहे. मद्रास हायकोर्टाने तामीळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवडय़ातून किमान एकदा तरी ‘वंदे मातरम’ गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन सदस्यांनी उघड बंड पुकारले. स्वातंत्र्यलढय़ात ‘वंदे मातरम’ हा मंत्र जपत अनेक क्रांतिकारकांनी फासाचा दोर गळय़ाभोवती लपेटून घेतला व राष्ट्रासाठी हसत हसत हौतात्म्य पत्करले. त्यात मुसलमान क्रांतिकारकांचाही समावेश आहे. अब्दुल हमीदसारखे अनेक जवान देशाच्या सीमेवर लढताना हुतात्मा झाले व त्यांचे शेवटचे शब्द ‘‘भारतमाता की जय, वंदे मातरम!’’ हे होते. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची रचना नंतर झाली. त्याआधी ‘वंदे मातरम’ अस्तित्वात आले. ‘वंदे मातरम’चा सोपा अर्थ इतकाच ‘हे मातृभूमी तुला सलाम! ए राष्ट्रमाता तुला वंदन!’ मग ज्या देशात तुम्ही राहता, खाता, पिता, हवा-पाणी वापरता त्या देशापुढे झुकायला तुमचा धर्म परवानगी देत नसेल तर त्या धर्मात दुरुस्ती करून घ्या. मौलाना अबुल कलाम आझादांपासून ते एपीजे अब्दुल कलामांपर्यंत अनेक महान नेत्यांनी ‘वंदे मातरम’चा गजर केला व त्यांच्या राष्ट्रभक्तीत अल्ला आणि धर्म आडवा आला नाही. मग हा धर्म अबू आझमी व वारीस पठाणसारख्यांनाच आडवा का यावा? अर्थात, हा
सवाल जुनाच
आहे. ‘वंदे मातरम’प्रश्नी राष्ट्रद्रोही भूमिका घेणाऱया धर्मांध मुसलमानांच्या बाबतीत सरकारने कठोर भूमिका वेळीच घेतली असती तर त्यांच्या या देशद्रोही विषाला अशी वारंवार उकळी फुटली नसती. ही धर्मांध थेरं फक्त याच भूमीत चालतात. आझमी आणि पठाण यांचे वक्तव्य ही ‘व्होट बँके’चीच मस्ती आहे. अर्थात, देशातील मुसलमान समाज आझमी व पठाण यांना पाठिंबा देणार नाही. कारण मुसलमानांची नवी पिढी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहे. किंबहुना त्यामुळेच ‘भेंडी बाजार’ छाप पुढाऱयांची झोप उडाली आहे. देशातून बाहेर काढा, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही ही अबू आझमी आणि वारीस पठाण यांची भाषा मस्तवालपणाची आहे. अशा लोकांना देशातून बाहेर काढण्याची गरज नाही. विधानसभेने एक प्रस्ताव बहुमताने मंजूर करून दोन्ही आमदारांचे कायमचे निलंबन करावे. जो ‘वंदे मातरम’ला विरोध करील तो विधानसभा, लोकसभेत पोहोचणार नाही ही कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. आझमी, पठाण यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले तर आणि तरच इतर सापांचे फूत्कार बंद होतील.