भाजपाने केली उद्धव यांची उपेक्षा
By Admin | Published: October 11, 2015 05:20 AM2015-10-11T05:20:40+5:302015-10-11T05:20:40+5:30
दादरमधील इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाने
मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाने पद्धतशीरपणे दूर ठेवले आहे. ठाकरे यांना या समारंभाचे साधे आमंत्रणही सरकारकडून रात्रीपर्यंत गेलेले नव्हते. ही खेळी झाल्यानंतरही सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने अगतिकपणे ही उपेक्षा स्वीकारल्याचे चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होत असलेल्या या भूमिपूजन समारंभाचे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांसह अनेकांना फोनवरून दिले; पण उद्धव ठाकरे यांना फोनही केला नाही. ‘ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पाठविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले खरे; पण रात्री उशिरापर्यंत मेहता ‘मातोश्री’वर गेलेले नव्हते.
या उपेक्षेचा अंदाज आला तेव्हा उद्धव यांचा बीडचा दुष्काळी पाहणी दौरा आखला गेला. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची पाठराखण करण्यास पक्ष कटिबद्ध असल्याची भाषा शिवसेनेच्या नेत्यांनी सुरु केली आहे. पण गेल्या निवडणुकीपूर्वी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्यासाठी जिवाचे रान केलेल्या उद्धव यांना आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा मानबिंदू ठरणाऱ्या या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. राजकीय लाभाचा विचार करुन अपमान गिळून उद्धव यांनी कार्यक्रमाला जायचे ठरविलेच तरी तेथे त्यांचा मान राखण्यात राजशिष्टाचार आडवा येणार आहेच. ते गेलेच तरी व्यासपीठावर नसतील.
खा.रामदास आठवले, अॅड.प्रकाश आंबेडकर, डॉ.राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर, अॅड.सुलेखा कुंभारे या रिपब्लिकन नेत्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ.महादेव जानकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दूरध्वनीवरून आमंत्रित केले. मात्र, उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी मंत्र्यास पाठविणे पसंत केल्याने शिवसेनेला या समारंभाच्या निमित्ताने भाजपाने दुर्लक्षितच केल्याचे स्पष्ट झाले आहे. बोलणी करेन तर भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांशीच, अशी भूमिका घेत भाजपाच्या राज्यातील नेत्यांना कमी लेखणाऱ्या उद्धव यांना भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी दिलेला काटशह म्हणून या घटनाक्रमाकडे पाहिले जात आहे.
आपण वा मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना स्वत: आमंत्रित का केले नाही, असे दानवे यांना आज पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हसून उत्तर देण्याचे टाळले. ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याने अडचण होऊ शकते, एवढेच ते म्हणाले. डॉ.आबेंडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ही भाजपाने केलेली वचनपूर्ती आहे, असे ते म्हणाले.
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेली वेळ टाळायची नसल्याने आधी ठरल्यानुसार उद्धव ठाकरे बीड जिल्'ात जातील. उद्याचा भूमिपूजन समारंभ शासनाचा आहे की भाजपाच या खोलात जावून आम्हाला राजकारण करायचे नाही.
जे प्रकाश मेहता मातोश्रीवर जाणार असे दानवे यांनी सांगितले ते आज सायंकाळी शिर्डीहून मुंबईत परतले. सूत्रांनी सांगितले की ते आमंत्रण घेऊन मातोश्रीवर कधी येणार, अशी विचारणा मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याकडे तीन-चार वेळा मोबाईलवरून केली. मात्र, भाजपा श्रेष्ठींकडून स्पष्ट आदेश नसल्याने मेहता रात्रीपर्यंत मातोश्रीवर गेलेले नव्हते. रात्री ते घाटकोपरमध्ये फाल्गुनी पाठकच्या दांडिया कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसरीकडे, रामदास कदम, दिवाकर नेते असे शिवसेनेचे मंत्री दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आहेत.
शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे, महापौर स्रेहल आंबेकर हे राजशिष्टाचाराचा भाग म्हणून समारंभाला जाणार आहेत. शिवसेनेचे मंत्री जाण्याची शक्यता कमी आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी लोकमतला सांगितले की, मला मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला होता. मात्र अद्याप निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही. मी उद्या मुंबईत पोहोचत आहे. पत्रिका मिळाली तर समारंभाला जाईन.रिपाइंचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई म्हणाले की,मला मुख्यमंत्र्यांनी सन्मानाने आमंत्रित केले आहे. मी समारंभाला आणि बीकेसीवरील सभेलाही जाईन.(विशेष प्रतिनिधी)
पूर्वनियोजित बीड दौरा होणारच
मानापमानाची पूर्वकल्पना असल्यानेच की काय उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा पूर्वनियोजित असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. ते सोमवारी सकाळी बीडकडे रवाना होतील आणि सायंकाळी उशिरा मुंबईत परतणार आहेत.
आज भूमिपूजन... पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ४.२५ला चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. त्यानंतर ४.५० वाजता इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या स्मारकासाठी ४२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सायंकाळी ५.३०ला पंतप्रधानांच्या मुख्य उपस्थितीत बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
खा. रामदास आठवले, अॅड. प्रकाश आंबेडकर, डॉ. राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर, अॅड. सुलेखा कुंभारे या रिपब्लिकन नेत्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दूरध्वनीवरून आमंत्रित केले.