"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:24 AM2024-09-17T10:24:04+5:302024-09-17T10:25:49+5:30
उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. यातच पैठण येथे झालेल्या एका सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या भाषणाची सुरुवात करताना ठाकरेंनी "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, महाराष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी बांधवांनो..." असा उल्लेख केला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. त्यातूनच उद्धव ठाकरेंनीहिंदू मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय का अशी चर्चा सुरू आहे.
नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडी म्हणून लढवली. यावेळी प्रचाराच्या भाषणात उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो असा उल्लेख टाळत होते. हिंदू ऐवजी ते देशभक्त बांधवांनो असा प्रामुख्याने उल्लेख करायचे. १० मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरेंनी भाषण करताना हिंदू शब्द वगळला होता. ही लढाई देशाची म्हणून देशभक्त उल्लेख करतोय असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर इथं उद्धव ठाकरेंचं भाषण झालं.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये उद्धव ठाकरेंची १५ सप्टेंबर रोजी सभा पार पडली. या सभेत भाषणाची सुरुवात करताना ठाकरेंनी "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, महाराष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.." असा उल्लेख केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देशभक्त उल्लेख करणारे ठाकरे यांनी पुन्हा हिंदू बांधवांनो असं म्हणत लोकांना भगवी साद दिलीय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्णत: बदललं. मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेनेत बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट कट्टरविरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. ठाकरेंच्या या खेळीमुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. मात्र अडीच वर्षात भाजपाने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत. त्यात उद्धव ठाकरेंकडून व्होटबँक बांधणे सुरू आहे. लोकसभेत मुस्लीम मते मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळाली मात्र त्यांच्यापासून हिंदू मतदार दुरावल्याचं चित्र उभं राहिलं. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा दारूण पराभव झाला. सेनेचा बालेकिल्ला ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी पुन्हा हिंदू मतदारांना साद घातली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमकं काय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.